मराठवाड्यात कोण जिंकणार? भाजप-राष्ट्रवादीच्या उमेदवाराला बंडखोरांकडूनच आव्हान…

| Updated on: Jan 21, 2023 | 11:15 AM

भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही उमेदवारांना पक्षातूनच बंडखोरीला सामोरं जावं लागणार आहे.

मराठवाड्यात कोण जिंकणार? भाजप-राष्ट्रवादीच्या उमेदवाराला बंडखोरांकडूनच आव्हान...
Image Credit source: social media
Follow us on

औरंगाबादः राज्यातील विधान परिषद निवडणुकीत (MLC Election) मतदानाची तारीख जसजशी जवळ येतेय, तशा राजकीय (Politics) हालचालींना वेग येतोय. यासोबत प्रमुख उमेदवारांसमोरी आव्हानंही अधिक स्पष्ट होत आहेत. मराठवाडा (Marathwada) शिक्षक मतदार संघ निवडणुकीतही मुख्य उमेदवारांसमोर पक्षातल्याच बंडखोरांचं आव्हान असल्याचं दिसून येतंय.

मराठवाडा शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत एकूण १५ उमेदवारांनी अर्ज भरला होता. एकाने माघार घेतल्यानंतर १४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विक्रम काळे आणि भाजपचे उमेदवार किरण पाटील यांच्यात खरी लढत होणार आहे.

राष्ट्रवादीतली बंडखोरी…

भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही उमेदवारांना पक्षातूनच बंडखोरीला सामोरं जावं लागणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून विक्रम काळे यांना अधिकृत उमेदवारी देण्यात आली. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या वक्ता सेलचे अध्यक्ष प्रदीप सोळुंके यांनीही आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलेला नाही.

माझ्यासारख्या अनेक कर्याकर्त्यांनी आजपर्यंत विक्रम काळे यांच्यासाठी काम केले. पण आमदार आमच्याकडे ढुंमकूनही पाहत नाहीत, त्यामुळे पक्षाने त्यांना उमेदवारी दिलीच कशी, असा सवाल त्यांनी विचारला आहे. त्यामुळे विक्रम काळे यांची मतं प्रदीप सोळुंके यांच्यामुळे फुटणार असल्याची दाट शक्यता आहे.

भाजपचीही शिष्टाई अपयशी?

तर भाजपचे उमेदवार किरण पाटील यांच्यासमोरही बंडखोरीचं मोठं आव्हान आहे. दोनच महिन्यांपूर्वी पक्षात आलेले किरण पाटील यांना शिक्षक मतदार नोंदणीसाठी फार वेळ मिळालेला नाही. ३० जानेवारी रोजी मतदान आहे. भाजप असंख्य मतदारांपर्यंत पोहोचू शकेल की नाही, याची शंका आहे.

काही दिवसांपूर्वी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मराठवाड्यात आले होते. मात्र भाजपमधील नाराजांची समजूत काढण्यात ते अपयशी ठरल्याचं समोर आलंय. त्यामुळेच नितीन कुलकर्णी यांनी उमेदवारी अर्ज कायम ठेवलाय. आता किरण पाटील यांच्यासमोर नितीन कुलकर्णी यांचंही आव्हान आहे.


भाजपात सतत अन्याय होत असल्याने मी निवडणुकीत उडी घेतली आहे. माझी लढाई राष्ट्रवादी काँग्रसचे उमेदवार आमदार विक्रम काळे यांच्याविरुद्ध आहे. तर राष्ट्रवादीचे बंडखोर प्रदीप सोळुंके आणि मी दोघेही समदुःखी असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.