मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठात (Uddhav Thackeray on JNU attack) झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध केला. जेएनयूमध्ये बुरखा घालून हल्ला करणारे कोण होते, बुरख्यामागील खरे चेहरे समोर आणा, विद्यार्थ्यांवरील हल्ला हा देशावरील कलंक आहे. महाराष्ट्रात विद्यार्थ्यांच्या केसाला धक्का लागू देणार नाही, असा हल्लाबोल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला. (Uddhav Thackeray on JNU attack)
रविवारी (5 जानेवारी) दिल्लीत जेएनयूत जे घडलं याच्याबाबत कुणाची तरी मतमतांतरे असू शकतात. ती असली तरी, यामुळे 26 नोव्हेंबरला मुंबईत झालेल्या दशतवादी हल्ल्याची आठवण व्हावी असा तो हल्ला होता. वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून मी हा हल्ला पाहिला. हे लोक कोण आहेत, कोठून आलेत? त्या बुरख्याआडचा खरा चेहरा कोणचा आहे? हे जनतेसमोर आलं पाहिजे – उद्धव ठाकरे
जर विद्यार्थी आणि विद्यार्थीनी त्यांच्या वसतिगृहातही सुरक्षित नसतील, तर देशाची स्थिती कठिण आहे, भारतात सरकार कुणाचंही असो हे हल्ले सहन केले जाणार नाहीत, असं मुख्यमंत्री म्हणाले. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी निश्चिंत राहावं, राज्यात असा कोणताही प्रकार सहन करणार नाही, जेएनयूच्या हल्ल्याने 26/11 हल्ल्याची आठवण आली, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
देशात जी काही अस्थिरता निर्माण झालीय त्याबाबत विचार करण्याची गरज आहे. बुरखाधारी डरपोक आहेत. त्यांचा शोध घेऊन कडक कारवाई झाली पाहिजे. त्यांना बुरखा घालण्याची गरज कारण ते डरपोक होते. असे हल्ले महाराष्ट्रात खपवून घेतले जाणार नाही. विरोध तर होणारच , जे कोणी जबाबदार आहेत त्यांना शोधून त्यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे. यात मी कोणतंही राजकारण आणू इच्छित नाही, यामागचा खरा चेहरा समोर आणण गरजेचं. यात पोलिसांचं कर्तव्य आहे त्यांनी कारवाई न केल्यास ते सुद्धा संशयास्पद.
निःपक्षपातीपणाने याची चौकशी व्हावी आणि यामागचा खरा चेहरा ओरबडून समोर आला पाहिजे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
युवकांना विश्वासात घेतले पाहिजे. ते भावी आधारस्तंभ आहेत. युवकांमध्ये अस्थिरता निर्माण झाली आहे. जर ते सुरक्षित नसतील तर ते कलंकीत आहे. महाराष्ट्रात असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. महाराष्ट्र सुरक्षित आहे. कोणाच्याही केसाला हात लावून देणार नाही.
सरकारने हल्लेखोरांवर कारवाई केली नाही, तर मग यात नेमकं काय राजकारण आहे हे शोधावं लागेल, हा नियोजित हल्ला होता की नाही ते येणाऱ्या काळात लवकरच समोर येईल, असं मुख्यमंत्री ठाकरेंनी नमूद केलं.
पोलिसांनी हल्लेखोरांवर कारवाई केली नाही, तर त्यांच्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित राहिल, हल्लेखोरांच्या चेहऱ्यावरील बुरखा हटवून खरे चेहरे समोर यायला हवेत, असं मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.
एक तर असा हल्ला करायला नको होता, मात्र, तरिही त्यांना हल्ला करायचाच होता तर त्यांनी आपले चेहरे लपवण्याची काय गरज होती? बुरखाधारी हल्लेखोर घाबरट आहेत. त्यांच्यात हिंमत असती, धाडस असती तर त्यांनी चेहऱ्यावर मुखवटा घातला नसता. त्यांच्यात इतकीही हिंमत नाही. ते जे कुणी असतील त्यांचा शोध घेऊन त्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हायला हवी – उद्धव ठाकरे
विद्यार्थी देशाचं भविष्य, ते त्यांचा उद्रेक व्यक्त करत आहेत, विद्यार्थ्यांसारखा उद्रेक माझ्यातही आहे, तोच मी येथे व्यक्त करत आहे. मी तरुणांसोबत आहे, महाराष्ट्रात असा कोणताही प्रकार सहन करणार नाही, आवश्यक असेल तर महाराष्ट्रातील विद्यापीठांची सुरक्षा वाढवण्यावरही निर्णय घेतला जाईल, असं मुख्यमंत्री ठाकरेंनी नमूद केलं.