माथेरान : ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर टीका केली आहे. गुलाबराव पाटलांच्या विधानांवरून आदित्य ठाकरे यांनी घणाघात केलाय. गुलाबराव पाटील यांची सातच्या आधीची आणि सातच्या नंतरची वक्तव्य वेगवेगळी असतात, असं टीकास्त्र आदित्य ठाकरे यांनी डागलं आहे.
माथेरान हिल स्पोर्ट्स क्लबचं आज उद्घाटन झालं. तिथे बोलताना आदित्य ठाकरे यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. शरद पवार यांचा राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा, नंतर घेतलेली माघार आणि बारसूतील रिफायनरी विरोधातील आंदोलन, उद्धव ठाकरे यांचा दौरा यावरही आदित्य ठाकरे बोललेत.
शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून निवृत्तीची घोषणा केली. राष्ट्रवादीच्या नेत्या आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहानंतर त्यांनी आपला निर्णय काल मागे घेतला. त्यावरही आदित्य ठाकरे बोलले आहेत. महाविकास आघाडी ही आपल्या देशाच्या संविधानाच्या रक्षणासाठी एकत्र आली आहे. जिथे जिथे हुकूमशाहीची लक्षणे दिसत आहेत तिथे आम्ही लढत आहोत आणि ही लढाई पुढेही अशीच सुरू राहील, असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.
आता ज्या काही बाजार समितीच्या निवडणुका झाल्या. त्यापूर्वी विधान परिषद असेल, यामध्ये महाविकास आघाडीला जे काही यश मिळालं आहे आणि मिळणार आहे त्यामुळे राज्यात महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा या निवडणुका होऊ देत नाहीयेत. त्यामुळे आता संविधान आणि लोकशाही धोक्यात आली आहे, असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी सरकारवर टीका केली आहे.
बारसूतील रिफायनरी प्रकल्पाला होणारा विरोध आणि उद्धव ठाकरे यांचा बारसू दौरा यावरही आदित्य ठाकरे बोललेत. आव्हानाला आम्ही जास्त महत्व देत नाही. सभेला परवानगी नाकारणे ही जशी हुकूमशाही दादागिरी हे घटनाबाह्य सरकार तिथल्या नागरिकांवर करते, ती आमच्यावरही दाखवत आहेत, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय.
मुळात प्रश्न हाच राहतो की इतका चांगला प्रकल्प असेल तर लाठीचार्ज आणि अश्रूधुर सोडण्याची काय गरज आहे? पालघरमध्ये आदिवासी महिलांना घराबाहेर काढलं गेलं. बारसूमध्ये असं होतंय. अनेक ठिकाणी ही हुकूमशाही आपल्याला आता दिसते. ही राजवट हुकूमशाहीची आहे, असंही आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.