मुंबई : राजकीय नाट्यानंतर आता (Assembly Speaker) विधानसभा अध्यक्षांच्या निवडीवरुन रणकंदन सुरु झाले आहे. एकापाठोपाठ एक राजकीय घडामोडीला वेग येत असून आता विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडीवरुन (BJP) भाजप-शिंदे गट व महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच सुरु झाली आहे. भाजपाने दिलेला उमेदवार हा सत्याच्या बाजूने आहे तर विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पक्षाचा व्हीप हा गरजेच नसतो. शिवाय (MVA) महाविकास आघाडीमध्ये कधी एकमत नव्हतेच शिवाय राजकीय स्वार्थासाठी त्यांनी विधानसभा अध्यक्ष पदाची नेमणूकच केली नाही असा घणाघात भाजपाचे सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. रविवारी विधानसभा अध्यक्ष पदाची नेमणूक होत आहे. यासाठी भाजपाकडून राहुल नार्वेकर तर महाविकास आघाडीकडून राजन साळवी यांनी अर्ज दाखल केले आहेत.
विधानसभा अध्यक्ष पदाची निवड ही तशी बिनविरोधच होत असते. पण सध्याच्या राजकीय नाट्यानंतर काहीही होऊ शकते. यामुळे महाविकास आघाडीने देखील उमेदवार दिला आहे. तर दुसरीकडे विधानसभा अध्यक्षपदाची निवड करण्यासाठी व्हीप लागतच नाही. सभागृहात उपस्थित असलेल्या सदस्यांच्या बहुमतावरुन अध्यक्ष ठरविला जात असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले आहे. त्यामुळे राजकीय नाट्यानंतर या सर्व बाबींवर पडदा पडेल असे वाटत असताना आता अध्यक्ष पदावरुनही राजकारण सुरु झाले आहे. तर दुसरीकडे बंडखोर आमदारांचेही मत महाविकास आघाडी उमेदवाराला मिळतील असा विश्वास महाविकास आघाडीकडून व्यक्त केला जात आहे.
सभागृहाच्या अध्यक्ष पदाची निवड ही महत्वाची असते. त्यानुसारच सभागृहातील निर्णयांना अर्थ प्राप्त होतो. असे असाताना महाविकास आघाडी सरकारने अध्यक्ष पदाची निवडच केली नाही. त्यांचे धोरण हे लोकशाहीला घातक होते. माझा पक्ष, माझा विकास हीच या आघाडीमधील नेत्यांचे विचार असल्याचे म्हणत मुनगंटीवार यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केली. तर भाजपाचा उमेदवार हा सत्याच्या बाजूने असणार तर महाविकास आघाडीकडून केवळ राजकारण करण्यासाठी उमेदवार दिल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
महाविकास आघाडी सरकारने अध्यक्षांची निवडच केली नाही. जे लोकशाहीसाठी घातक होते. एकीकडे हिदुत्वाचा विचार सांगून दुसरीकडे पक्षाचे हित जोपासण्यावरच त्यांनी भर दिला. या तीन पक्षामध्ये कधी एकी नव्हतीच. अंतर्गत कलहातून जे झाले ते देशासमोर आहे. त्यामुळे सरकार स्थापनेपासून यांचे विचार समाजकारण आणि जनतेच्या विकासासाठी नव्हतेच असा घणाघात मुनगंटीवार यांनी केला. तर भाजप आणि शिंदे गटाचाच अध्यक्ष होणार आता केवळ औपचारिकता बाकी असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.