MCAच्या निवडणुकीत राजकारणी विरुद्ध किक्रेटर सामना? आजचा दिवस महत्त्वाचा कारण…

| Updated on: Oct 10, 2022 | 10:12 AM

BCCI चे माजी अध्यक्ष शरद पवार यांच्या खेळीमुळे MCA निवडणुकीच्या सामन्यातील चुरस वाढली

MCAच्या निवडणुकीत राजकारणी विरुद्ध किक्रेटर सामना? आजचा दिवस महत्त्वाचा कारण...
महत्त्वाची अपडेट
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

दिनेश दुखंडे, TV9 मराठी मुंबई : एमसीए (Mumbai Cricket Association) अध्यक्ष पदासाठी होणाऱ्या निवडणुकीच्या शर्यतीत रंगतदार लढतीची दाट शक्यता आहे. या निवडणुकीमध्ये आशिष शेलार (Ashish Shelar) आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील, अशी शक्यता वर्तवण्यात आलीय. त्यामुळे एमसीए अध्यक्ष (MCA Election) पदासाठी होणारी निवडणूक चुरशीची होईल, असं बोललं जातंय.

विशेष म्हणजे या निवडणुकीत राजकीय नेते विरुद्ध क्रिकेटर, असा सामना रंगण्याची दाट शक्यता आहे. कारण शरद पवार गटाकडून एक दिग्गज क्रिकेटपटू या निवडणुकीच्या रिंगणात आधीच उतरलाय. अशातच आता भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार हे देखील एमसीए अध्यक्षपदासाठी इच्छुक असल्याचं कळतंय.

आजचा दिवस निर्णायक

एमसीए अध्यक्षपद निवडणूक प्रक्रियेतील आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचाय. अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आज संपतेय. त्यामुळे उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी आशिष शेलार यांच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

हे सुद्धा वाचा

बरोबर दहा दिवसांनी म्हणजेच 20 ऑक्टोबरला एमसीएची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत आशिष शेलार जर उतरले, तर तब्बल 11 वर्षांनंतर राजकारणी विरुद्ध क्रिकेटपटू अशी चुरशीची लढत अध्यक्षपदासाठी होताना पाहायला मिळेल.

पाहा व्हिडीओ :

शरद पवार गटाकडून भारताचे माजी क्रिकेटपटू संदीप पाटील हे देखील अध्यक्षपदासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. आता 20 ऑक्टोबरला संदीप पाटील विरुद्ध आशिष शेलार अशी निवडणूक होण्याची दाट शक्यता आहे.

एमसीए अर्थात मुंबई क्रिकेट असोसिएशनची सुरुवात 1930 साली करण्यात आली होती. मुंबईसोबत आसपासच्या प्रमुख शहरातील मुलांना एक महत्त्वाचा दुवा म्हणून एमसीएकडे पाहिलं जातं. ठाणे, नवी मुंबई, पनवेल, पालघर या भागातील मुलांसाठी एमसीएने अनेकदा महत्त्वाची भूमिका बजावली आहे. बीसीसीआय अध्यक्ष शरद पवार यांनी देखील एमसीएचं अध्यक्षपद भूषवलेलंय. दरम्यान, आता होत असलेल्या एमसीए अध्यक्ष निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आलाय.