साईबाबा जन्मस्थळ वाद: शिर्डीकरांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत बैठक

| Updated on: Jan 20, 2020 | 3:30 PM

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यापाठोपाठ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिर्डीच्या साईबाबांच्या जन्मस्थळाबाबत विधान केल्यानंतर मोठा वाद झाला (Saibaba Birthplace dispute).

साईबाबा जन्मस्थळ वाद: शिर्डीकरांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत बैठक
Follow us on

मुंबई : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यापाठोपाठ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिर्डीच्या साईबाबांच्या जन्मस्थळाबाबत विधान केल्यानंतर मोठा वाद झाला (Saibaba Birthplace dispute). अगदी शिर्डी बंदही पाळण्यात आला. मात्र, अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनानंतर शिर्डीकर तात्पुरता बंद मागे घेत मुंबईला चर्चेस आले आहेत (Saibaba Birthplace dispute). शिर्डीकरांचं 30 जणांचं शिष्टमंडळ मंत्रालयात मुख्यमंत्र्यांशी बोलत आहे. आता या बैठकीत काय तोडगा निघतो याकडे अनेकांचं लक्ष लागून आहे.

दरम्यान, साईंच्या जन्मभूमीच्या वादानंतर शिर्डीकरांनी कडकडीत बेमुदत बंदची घोषणा केली होती. रविवारी पहिल्या दिवशी शिर्डीत अगदी कडकडीत बंद पाळण्यात आला. त्यामुळे साईभक्तांची बरेच हालही झाले. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिर्डीकरांना बंद मागे घेत चर्चेसाठी बोलावलं. आज मंत्रालयात त्याच विषयी बैठक होत आहे.

शिर्डीकरांनी बंद मागे घेतल्यानंतर शिर्डीतील जनजीवन सामान्य झालं आहे. सर्व दुकानं खुली झाली असून रात्री बारानंतर साईभक्तांना सर्व सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. भाविक हार-प्रसाद घेण्यासाठी दुकानात मोठी गर्दी करत आहेत. विशेष म्हणजे शिर्डी बंदनंतर आता शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांचं देखील या वादाकडे लक्ष लागलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाथरीचा उल्लेख साईबाबांचं जन्मस्थळ म्हणून करत त्याच्या विकासासाठी 100 कोटी रुपये देण्याची घोषणाही केली आहे. त्यामुळे आता या निधीचं काय होणार हाही प्रश्न आहे. दरम्यान, साईबाबांना एका धर्मात बांधू नये. त्यांनी कधी जात-धर्म कोणासही सांगितला नाही. ते कुठून आले, जन्म कोठे झाला तेही त्यांनी सांगितलं नाही. साईबाबांना सर्व जाती-धर्माच्या लोकांनी आपलं मानलं. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आपलं विधान मागे घ्यावं, अशी भूमिका शिर्डीकरांची घेतलेली आहे. मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत या वादावर सकारात्मक निर्णय होईल, असा आशावाद शिर्डी ग्रामस्थांना आहे.

शिर्डीकरांच्या शिष्टमंडळात कुणाचा सहभाग?

माजी विश्वस्त एकनाथ गोंदकर, साईचरीत्राचे अभ्यासक आणि शिर्डी गँझेटीयरचे लेखक प्रमोद आहेर, माजी नगराध्यक्ष आणि माजी विश्वस्त कैलास कोते, भाजपचे उत्तर जिल्हा अध्यक्ष राजेंद्र गोंदकर, शिवसेनेचे कमलाकर कोते, साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिपक मुगळीकर, उप कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, शिर्डी साई मंदीराचे पुजारी बाळकृष्ण जोशी, प्रांताधिकारी गोविंद शिंदे, शिर्डीचे ग्रामस्थ नितीन कोते, अभय शेळके, गणीभाई पठाण -अब्दुलबाबांचे वंशज आदी लोक या बैठकीला उपस्थित आहेत.