नवी दिल्ली : भाजपने ‘मेरा परिवार, भाजपा परिवार’ ही मोहिम सुरु केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक भाजप कार्यकर्त्याच्या घरावर भाजपचा झेंडा फडकवण्यासाठी ही मोहिम भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांनी त्यांच्या गुजरातमधील घरापासून सुरु केली. या मोहिमेत गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचा फोटो लक्ष वेधून घेतोय.
मनोहर पर्रिकर यांनी ‘मेरा परिवार, भाजपा परिवार’ या मोहिमेत सहभाग घेत हातात झेंडा घेतलेला फोटो शेअर केलाय. मनोहर पर्रिकर सध्या कॅन्सरशी झुंज देत आहेत. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांच्या नाकात ट्यूब घातलेली असतानाही त्यांनी पक्षाच्या कार्यक्रमात सहभाग घेत सोशल मीडियावर फोटो शेअर केला आहे. या फोटोत पर्रिकर यांचा मुलगा आणि सूनही दिसत आहेत.
True to its credo, @BJP4India puts India’s interest over everything else. Proud to be part of such a family that is #TransformingIndia like never before. #MeraParivarBhajapaParivar pic.twitter.com/ym7Y6zuhoA
— Manohar Parrikar Memorial (@manoharparrikar) February 12, 2019
‘मेरा परिवार, भाजपा परिवार’ या मोहिमेतून भाजपा पुन्हा एकदा मोदींना पंतप्रधान करण्याचा संकल्प करणार आहे. कार्यकर्त्यांच्या घरावर झेंडा फडकवून भाजपचं चिन्ह प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचवण्याची रणनीती आखण्यात आली आहे.
भाजपचे डिजीटल रथ
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने प्रचाराला सुरुवात केली आहे. ‘भारत के मन की बात, मोदी के साथ’ या कार्यक्रमाने भाजपच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. भाजप प्रचार कार्यक्रमादरम्यान भारतीय जनतेचे काय विचार आहेत, देशाच्या विकासासाठी त्यांचे सल्ले जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहेत. भाजप आपले संकल्प पत्र तयार करण्याकरिता घरोघरी पोहचण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी 300 एलईडी स्क्रिन असलेले रथ तयार करण्यात आले आहेत.
या कार्यक्रमाच्या रथाला भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी हिरवा झेंडा दाखवला होता. यावेळी अमित शाह म्हणाले होते की, ‘देशाची जनता देशासाठी नवी सरकार निवडण्यासाठी सज्ज झाली आहे. 2014 सालाआधी देशाची जी अवस्था होती ती निराश करणारी होती. त्याआधी 30 वर्ष मिश्रित सरकार होती. देशवासीयांच्या मनात अनेक प्रश्न होते. फक्त निवडणूक जिंकण्याकरिता बजेट मांडण्यात येत होतं. यामुळे जनता देशाचा विचार कारायला विसरली आहे’, असा टोमणा अमित शाहांनी काँग्रेसला लगावला होता.
‘भारत के मन की बात, मोदी के साथ’ या कार्यक्रमासाठी 12 पॅनल बनवण्यात आले आहेत.
1) शेतकरी – शिवराज चौहान
2) युवा खेळूड – राजीव चांदशेखर
3) महिला – स्मृती इराणी
4) अनुसूचित जाती – ठावरसिंग गेहलोत
5) विज्ञात – हर्षवर्धन
6) उद्योग व्यापार – अरुण जेटली
7) इन्फ्रास्ट्रक्चर – हरदीप पुरी
8) शिक्षा – प्रकाश जावडेकर
9) सेना – भूवन चंद्र खंडुरी आणि किरण रिजिजू
10 ) सांस्कृतिक, गंगा, रामजन्मभूमी – महेश शर्मा
11) मजदूर – बंडारू दत्तात्रय
तसेच 6357171717 या क्रमांकावर संपर्क करुनही जनता आपला सल्ला भाजपपर्यंत पोहचवू शकते. 2014 प्रमाणे या निवडणुकीतही सोशल मीडियाचा पुरेपूर उपयोग केला जात आहे. याकरिता www.bharatkemannkibaat.com ही साईट तयार करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामवर ‘bkmkb2019’ या नावाने नवीन पेज सुरू करण्यात आला आहे.