सोलापूर : राज्यात सत्तासंघर्षाचा वाद पेटलेला असताना सोलापूर शहर मध्य मतदारसंघात मात्र एका व्हायरल व्हिडीओवरुन राजकारण चांगलंच पेटलं आहे. काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे उद्या मरु शकतात आणि निवडणुका लागू शकतात, असं धक्कादायक वक्तव्य एमआयएमचे पराभूत उमेदवार फारुक शाब्दी यांनी केल्याचा आरोप (MIM Candidate on Praniti Shinde) केला जात आहे.
व्हायरल व्हिडीओमुळे काँग्रेसने फारुख शाब्दी यांचा निषेध करत त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. मात्र फारुख शाब्दी यांनी आपल्या वक्तव्याची तोडफोड करत खोटा व्हिडीओ व्हायरल केल्याचा दावा केला आहे. तरीही कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील, तर माफी मागत असल्याचं सांगत प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
सोलापूर शहर मध्य मतदारसंघात फारुख शाब्दी दुसऱ्या क्रमांकावर राहिले. आपल्या पराभवाची मीमांसा करताना फारुख शाब्दी यांची जीभ घसरल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.
व्हिडीओमध्ये काय?
माझा पैसा गेला तरी मी पुन्हा कमवू शकतो. मात्र या वेळेस जसा उत्साह होता, तसा पुढच्या वेळेस मी इतका पळू शकणार की नाही, मला पाठिंबा मिळेल का, मी जिवंत असेन का माहित नाही. कधीही काहीही होऊ शकतं. तसं तर प्रणिती शिंदे उद्या मरु शकतात, तर पुन्हा निवडणुका लागतील’ असं धक्कादायक वक्तव्य शाब्दी यांनी केल्याचं व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे.
काँग्रेस आणि युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्याकडून एमआयएमच्या फारुक शाब्दी यांच्याविरोधात जोरदार निदर्शनं करण्यात आली आहेत. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
फारुख शाब्दी यांनी मात्र आपल्या वक्तव्याची तोडफोड करत खोटा व्हिडीओ व्हायरल केल्याचा दावा केला आहे. तरीही कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील, तर माफी मागतो, असंही ते म्हणाले.
राजकारणात एकमेकांच्या विरोधात आरोप प्रत्यारोप होत असतात. मात्र सभ्य समाजात एखाद्याच्या मृत्यूवर घसरणं (MIM Candidate on Praniti Shinde) राजकीय नेत्यांसाठी अशोभनीय आहे.