नवी दिल्लीः केवळ राजकीय फायद्यासाठी भाजपने शिवसेनेत भांडणं लावून दिलेली आहेत. बीएमसीवर (BMC Election) सत्ता मिळवणं हाच भाजपचा या मागील हेतू आहे. एकदा मुंबई महापालिका भाजपच्या (BJP) हातात आल्यावर त्यांच्यासमोर दुसरं कोणतंही मोठं आव्हान नाही. त्यानंतर शिंदे गटाला ते कुठे सोडून देतील कळणारही नाही, हा माझा अंदाज खरा ठरणार असून तुम्ही आजच हे रेकॉर्ड करून ठेवा, असं वक्तव्य एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (MP Imtiaz Jaleel) यांनी केलं आहे. भाजपावर टीका करताना खा. जलील यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवरही चौफेर टीका केली आहे. यांना गरज पडते तेव्हा सेक्युलर भूमिका स्वीकारतात, असं खा. जलील म्हणाले. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत एमआयएमने यूपीएच्या उमेदवार मार्गारेट अल्वा यांना पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत या विषयावर झालेल्या बैठकीला खा. जलील हजर होते.
भाजप आणि शिंदे सेनेच्या महायुतीवर आक्रमक टीका कराताना खा. जलील म्हणाले, भाजपा फक्त शिवसेनेचा उपयोग करत आहे. मुंबई महापालिकेवर एकहाती सत्ता मिळवणे, हाच त्यांचा उद्देश आहे. एकदा का मुंबईवर कब्जा झाला की ते कोणाला कुठे सोडून देतील माहिती नाही. भाजपला शिवसेनेत दोन गट पाडायचे होते. मुंबई महापालिका भाजपला मिळवायची आहे. त्यासाठी त्यांनी शिवसेनेत भांडणं लावलीत. आणि त्यात भाजपा यश मिळालं आहे.
औरंगाबाद महापालिकेत पुढचा महापौर एमआयएमचाच होणार, असं मोठं वक्तव्य खासदार इम्तियाज जलील यांनी केलं आहे. राजकीय स्वार्थापोटी शहराचं नामांतर करण्याचा घाट घातला जातोय. त्यामुळे मुस्लिम जनता नाराज आहे. शहरातील मुस्लिम लोक औरंगजेबाला फॉलो करत नाहीत, पण तो इतिहासाचा एक भाग आहे. तो मिटवता येणार नाही. शहरात काही सुविधा नसताना फक्त श्रेय लाटण्यासाठी नाव बदलण्याचा घाट घातला जातोय, याला जनता उत्तर देणारच असं वक्तव्य खा. जलील यांनी केलंय.
राज्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करताना इम्तियाज जलील म्हणाले, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे गरजेनुसार, सेक्युलर भूमिका स्वीकारतात. मात्र राजकारण करायचं असतं तेव्हा एमआयएम पक्षावर सर्रास भाजपची बी टीम असल्याचा आरोप केला जातो. मात्र आता मुस्लिमांचा मोठा व्होट बँक काँग्रेस आणि राष्ट्रवादीपासून दूर गेलाय, असं वक्तव्य त्यांनी केलं. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत बैठकीला बोलावलं म्हणून मी आलो. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसंदर्भात आम्ही एकत्रितपणे निर्णय घेतल्याची माहितीही खा. जलील यांनी दिली.