दत्ता कनवटे, औरंगाबादः मुस्लिम समाज ज्यांची पंचिंग बॅग होता. स्टेजवर उभे राहून जे मुस्लिमांना टार्गेट करायचे, आता ते तसं करू शकणार नाहीत. शिवसेनेची (Shivsena) सध्याची अवस्था अत्यंत दुर्दैवी आहे. मलाही त्यांच्याबद्दल सहानुभूती आहे, असं वक्तव्य एमआयएमचे (MIM) खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी केलंय. महाराष्ट्राने आजपर्यंत एवढं घाणेरडं राजकारण पाहिलेलं नाही. आता सत्ता मिळवण्यासाठी कुणीही सोबत घेण्याची शिवसेनेची तयारी आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत ते आहेतच, आता एमआयएमलाही सोबत घेणार का, असा सवाल उपस्थित केला जातोय. यावर खा. जलील यांनी स्पष्टपणे नकार दिला. औरंगाबादमध्ये त्यांनी tv9 च्या प्रतिनिधींशी मोकळा संवाद साधला.
शिवसेना एमआयएमला असा प्रस्ताव देणार नाही आणि दिला तरी आम्ही त्यांच्यासोबत जाणार नाहीत, असं स्पष्ट शब्दात खा. जलील यांनी उत्तर दिलंय. भाजपने शिवसेना फोडून मराठी मतांचं मोठ्या प्रमाणावर विभाजन केल्याचं पाप केलंय, असा आरोप खा. जलील यांनी केलाय.
ते म्हणाले, ‘ महाराष्ट्राने कधीही एवढं घाणेरडं राजकारण पाहिलेलं नाही. शिवसेनेसोबत आमचे मतभेद आहेत.. पण मराठी अस्मिता शिवसेनेशी जोडलेली होती. मराठी लोकांसाठी ते एक ढाल म्हणून उभे होते.
आज जी परिस्थिती निर्माण झाली आहे. ती अमित शहा आणि भाजपमुळे झाली आहे. मराठी लोकांना त्यांनी फोडलंय, ते दुर्दैवी आहे. आतापर्यंत जे कुणी करू शकलं नाही, ते भाजपने केलंय. मराठी लोकांना फोडण्याचं पाप भाजपने केलंय, असा आरोप खा. जलील यांनी केला.
शिवसेनेबाबत मला सहानुभूती आहे. मीसुद्धा मराठी आहे. तुम्ही मला वेगळं समजू नका. महाराष्ट्रीयन आहे. शिवसेनेच्या राजकारणाला आजपर्यंत धार्मिक रंग होता, ती वेगळी गोष्ट आहे. त्यांची सॉफ्ट पंचिंग बॅग मुस्लिम समाज होता. पण आता शिवसेना फुटली. मुस्लिमांवर टार्गेट करायचे.. मंदिर, मस्जिद, खान, बाण असायचं. आता ते तसं करू शकणार नाहीत…असं वक्तव्य खा. जलील यांनी केलंय.
शिवसेनेत आता खूप बदल झालाय. सत्ता मिळवण्यासाठी ते कुणालाही सोबत घेतायत. पण एमआयएम शिवसेनेसोबत जाणार नाही, असं वक्तव्य खा. जलील यांनी केलंय.