Image Credit source: social media
नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा ग्राफ खाली घसरलाय, त्यामुळे त्यांनी आता अरविंद केजरीवाल यांना उभं केलंय, असा गंभीर आरोप एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (MP Imtiaz Jaleel) यांनी केलाय. आम आदमी पार्टी आणि अरविंद केजरीवाल ही भाजपने प्लांट केलेली बी टीम आहे, असे खळबळजनक आरोप खा. जलील यांनी केले आहेत. महाराष्ट्रात एमआयएमवरच भाजपाची बी टीम (BJP’s B team) असा आरोप केला जातो. आता एमआयएमनेच आम आदमी पार्टीवर असे आरोप केले आहेत. त्यामुळे खा. जलील यांच्या आरोपांकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष वेधलं गेलंय.
दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी काल एक विचित्र मागणीकरून राजकीय वर्तुळात खळबळ माजवली आहे. हिंदुत्वविरोधी अशी प्रतिमा निर्माण झालेल्या केजरीवाल यांनी भारतीय चलनातील नोटांवर हिंदु देवी-देवता लक्ष्मी आणि गणेशाचा फोटो असावा, अशी मागणी केली आहे. यावरून सर्वत्र आश्चर्य व्यक्त केलं जातंय. मात्र खा. जलील यांनी केजरीवाल यांच्या डोक्यात शेण भरलंय, असा घणाघात केला.
काय आहेत आरोप?
- नवी दिल्ल्लीत टीव्ही9 शी बोलताना खा. इम्तियाज जलील म्हणाले, ‘ अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पार्टी हे आरएसएस ने प्लांट केलेली भाजपची बी टीम आहे. नरेंद्र मोदी यांचा ग्राफ खाली येईल तेव्हा आपला दुसरा माणूस पाहिजे, त्यामुळं त्यांच्यातर्फे अरविंद केजरीवाल यांना उभं केलं आहे, असा आरोप खा. जलील यांनी केला.
- गुजरात निवडणूका आणि दिल्ली निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर अरविंद केजरीवाल यांनी ही मागणी केली आहे. हिंदुंच्या मतांसाठी त्यांनी ही मागणी केली आहे. त्यामुळे आम आदमी पार्टी भविष्यात हिंदुत्वाची आयडोलॉजी घेणार होते, हे आम्हाला माहित होतं, असा आरोप खा. जलील यांनी केलाय.
- आतापर्यंत रस्ते, पाणी, वीज, शिक्षण अशा गोष्टी मोफत आणि सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम आदमी पक्षाने प्राधान्य दिले. मात्र आता यांनी हे धोरण सोडलं आहे. लोकांना भावनिक मुद्द्यांत अडकवण्याचा प्रयत्न आहे. त्यांची आताची मागणी पाहून तर केजरीवाल यांच्या डोक्यात शेण भरलंय, असं वाटतंय, असा आरोप खा. जलील यांनी केलाय.
- हिंदुत्वविरोधी अशी प्रतिमा असूनही अरविंद केजरीवालांनी अशी मागणी केल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होतंय. मात्र हा भारतीय जनता पक्षाला कॉर्नर करण्याचा प्रयत्न आहे. सर्वसामान्यांना हे सजतंय. हिंदुत्वाच्या लढाईत सगळ्यांनीच उडी घेतली आहे.
- अरविंद केजरीवाल हा सरडा आहे. कधी ना कधी रंग बदलणार हे माहिती होतं, असा आरोप खा. जलील यांनी केलाय.