नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना दिल्लीतील कथित महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात मुंबईतील सत्र न्यायालयाने दिलासा दिला आहे. भुजबळ यांना न्यायालयाकडून क्लीन चीट मिळाल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आपण याप्रकरणी हायकोर्टात जाऊ, असा इशारा दिला आहे. त्यांच्या याच भूमिकेवर भुजबळ यांना प्रश्न विचारला असता त्यांनी दमानिया यांनी खुशाल हायकोर्टात जावं, लोकशाही आहे, अशी प्रतिक्रिया दिली.
छगन भुजबळ आज सायंकाळी नाशिकमध्ये दाखल झाले. यावेळी ढोल ताशे वाजवत आणि फटाके फोडून भुजबळांचं जंगी स्वागत करण्यात आलं. भुजबळांच्या स्वागतासाठी नाशिकमध्ये प्रचंड गर्दी जमली होती. यावेळी कार्यकर्त्यांनी पेढे भरवत, ढोलाच्या तालावर ठेकाही धरला. महिलांनी भुजबळांचं औक्षण केलं तर कार्यकर्त्यांनी त्यांना भला मोठा हार घातला. त्यानंतर भुजबळांनी पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. याचवेळी त्यांना अंजली दमानिया यांच्या भूमिकेवर प्रश्न विचारण्यात आला.
“लोकशाही आहे, त्यांनी खुशाल हायकोर्टात जावं. आम्ही अधिक उजळ माथ्याने समोर येऊ”, असं छगन भुजबळ यावेळी म्हणाले. यावेळी त्यांनी हिंदीतला एक शेरही म्हटला. “मेरे खिलाफ होनेवाली बातो को मैं अक्सर खमोशी से सूनता हुँ, जवाब देने का हक मैने वक्त को दे रखा है”, अशा शब्दात भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली.
राजकारणात शब्दाने शब्दाला उत्तर दिलं जातं आणि विचाराने विचाराला. परंतु, हल्लीच्या काळाज अडचणीत टाकण्याचा प्रकार सुरू झाला आहे. आता तर अधिकच अडचणीत टाकलं. त्यातूनच बाहेर वाकप्रचार सुरू झाला तुम्ही सरळ वागता की तुमचा भुजबळ करू. आता त्यांना तो वाकप्रचार वापरता येणार नाही. दुसरं काही तरी शोधावं लागेल, असा चिमटा त्यांनी काढला.
आम्ही जास्त बोलत असल्याने कदाचित लोकं दुखावत असतील. पण आम्ही राजकारणामध्ये विचाराची लढाई लढतो. त्यामुळे आम्ही सत्य मांडतो. पण माणसं दुखावली जातात. हल्ली अलिकडे हे जास्तच व्हायला लागलं. लोक पटदिशी दुखावतात आणि हातात असलेल्या सत्तेचा ताबडतोब गैरवापर करायला सुरुवात करतात. राजकारणात सहनशक्ती हवी. राजकारणात आम्हाला जसे हार पडतात तसे प्रहार झेलण्याची शक्तीही असायला हवी. प्रहार झेलण्याची शक्ती आता कमी होत चाललीय. त्यामुळे वेगवेगळ्या मार्गाने छळवणुकीचे प्रकार वाढले आहेत. लोकांना सगळं समजतं. यांच्यामागे पोलीस लावले, ईडी लावली… हे अमकं केलं तमकं केलं… पण निवडणुका येतात. सदा सर्वकाळ तुम्ही लोकांना मूर्ख बनवू शकत नाही. अनेक सरकारे पाहिली. काँग्रेसची, वाजपेयींचीही पाहिली. आता केंद्रात जे चाललंय ते अवर्णनीयच आहे, असा चिमटाही त्यांनी काढला.
आम्ही तुरुंगात असताना नाशिकमध्ये पाय ठेवायला जागा नव्हती एवढा मोर्चा नाशिककरांनी पाहिला. या मोर्चाला 12 ते 15 लाख लोक उपस्थित होते असा पोलिसांचा रिपोर्ट आहे. अनेक वयोवृद्ध आणि माताही या मोर्चात सहभागी झाल्या. केवळ भुजबळांना सोडावं या मागणीसाठी ते रस्त्यावर उतरले होते. अर्थात कायदेशीर मार्गानच जावं लागतं. त्याला पर्याय नसतो. पण माझी सुटका व्हावी म्हणून महाराष्ट्रभरातून कार्यकर्ते आले होते. अनेक कार्यकर्त्यांनी मोर्चासाठी मेहनत घेतली होती. त्यामुळे आत्मबळ वाढलं होतं. भुजबळांवर आरोप निराधार आहेत. ते निष्कलंक आहेत. आज ना उद्या ते बाहेर येतील असं वाटल्यानेच जनता रस्त्यावर उतरली, असं त्यांनी सांगितलं.
जनतेचे आशीर्वाद, तुमच्या सर्वांचं प्रेम आणि तुमच्या सर्वांचं सहकार्य यामुळे शुभ दिनी शुभ निर्णय आले. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहेत. आनंद होणं साहजिकच आहे. चार पाचवर्ष सातत्याने जे आमच्यावर आरोप लावले जात होते. कार्यकर्ते आम्हाला काही म्हणत नव्हते. पण त्यांच्या मनातलं दु:ख कळत होतं. कार्यकर्त्यांचं मन कसं जळत असेल हे कळत होतं. आम्ही तुरुंगात असताना आम्हाला ते अधिक जाणवत होतं. आम्हाला जी अटक झाली त्यामुळे कार्यकर्त्यांना तोंड द्यावं लागेल. त्यांना खाली पाहावं लागेल ही दु:खाची भावना सातत्याने मनात होती, असं सांगताना ते भावूक झाले होते.
हेही वाचा :
आता त्यांना ‘तुमचा भुजबळ करू’ असं म्हणता येणार नाही; छगन भुजबळ यांचा भाजपला टोला
सर्व राजकारणी एकाच माळेचे मणी, छगन भुजबळांविरोधात हायकोर्टात जाणार : अंजली दमानिया