मुंबई : राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. संध्याकाळी चारच्या सुमारास धनंजय मुंडेंना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. रुग्णालयातून बाहेर पडताना धनंजय मुंडे यांनी हात उंचावून आणि हात जोडत डॉक्टर, नर्स आणि इतर कर्मचाऱ्यांचे आभार मानले. (Dhananjay Munde Corona free Discharged From Hospital)
धनंजय मुंडे यांना अकरा दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु होते. दोन दिवसांपूर्वी त्यांची दुसरी कोरोना टेस्ट करण्यात आली. ही टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर आज त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. मात्र नियमानुसार पुढील 14 दिवस धनंजय मुंडे यांना होम क्वारंटाईन राहावे लागणार आहे.
रुग्णालयातून डिस्चार्ज दिल्यानंतर त्यांनी बाहेर पडताना रुग्णालयातील डॉक्टर, नर्स आणि इतर आरोग्य कर्मचाऱ्यांचे हात जोडून आभार मानले.
धनंजय मुंडे यांच्यासोबत कोरोनाची लागण झालेले त्यांचे खाजगी सचिव, एक स्वीय सहाय्यक, दोन वाहन चालक, एक अंगरक्षक यांनाही रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. या सर्वांची दुसरी चाचणीही निगेटिव्ह आली. त्यामुळे आता केवळ एक अंगरक्षक आणि एक कुक असे दोघेच जण रुग्णालयात उपचार घेत आहे. त्यांच्याही प्रकृतीत सुधारणा होत आहे.
दिलासादायक म्हणजे धनंजय मुंडेंच्या कुटुंबियांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला होता. धनंजय मुंडेंना कोरोनाची लागण झाल्यानंतर बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार, पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार हेदेखील काही दिवस होम क्वारंटाईन झाले होते.
धनंजय मुंडे हे बीडमधील परळीचे आमदार आहेत. गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत ते आमदारपदी निवडून आले. ठाकरे सरकारमध्ये त्यांच्या खांद्यावर सामाजिक न्याय मंत्रिपदाची धुरा देण्यात आली. त्यांनी आपल्या समर्थकांना उपास-तापास, नवस न करण्याचे आवाहन केले होते.
ठाकरे सरकारमधील तिसऱ्या मंत्र्याला संसर्ग
ठाकरे सरकारमधील तिसऱ्या मंत्र्याला कोरोनाची लागण झाली. याआधी राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनाही कोरोनाची लागण झाली होती. सुदैवाने या दोन्ही मंत्र्यांनी कोरोनावर मात केली.
Dhananjay Munde Corona | धनंजय मुंडे यांचा दुसरा ‘कोरोना’ रिपोर्ट आल्यानंतर हॉस्पिटलमधून डिस्चार्ज दिला जाण्याची चिन्हं https://t.co/Og9Ez3LTK7 @dhananjay_munde @OfficeofDM #dhananjaymunde @Ksbsunil
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 22, 2020
(Dhananjay Munde Corona free Discharged From Hospital)
संबंधित बातम्या :
धनंजय मुंडेंच्या कुटुंबियांचा अहवाल निगेटिव्ह, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख होम क्वारंटाईन