कोल्हापूर | 1 डिसेंबर 2023 : राष्ट्रवादी पक्षाची साल 2004 मध्येही भाजपाबरोबर युती होणार होती आणि आपल्या दिल्लीतील घरी गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन यांच्याशी चर्चा झाली होती असा दावा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते प्रफुल पटेल यांनी केला आहे. यावर राष्ट्रवादीचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी याबाबत वारंवार आम्ही भूमिका स्पष्ट केली आहे. प्रफुल पटेल यांनीही यापूर्वीच सांगितले आहे. साल 2004 मध्ये आमचा भाजपासोबत जाण्याचा निर्णय झाला होता असे राष्ट्रवादीचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी दुजोरा दिला आहे.
शरद पवार यांना घरी बसविण्यासाठी अजितदादा गटाने सुपारी घेतल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी केला आहे यासंदर्भात विचारले असता हसन मुश्रीफ यांनी अनिल देशमुख यांनी वेळोवेळी राजकीय भूमिका बदलली आहे, त्याचा आपण साक्षीदार असल्याचे म्हटले आहे त्यांनी यावर बोलू नये असेही मुश्रीफ यांनी म्हटले आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस संपविण्यासाठी राज्यात पाठवलं होते. पृथ्वीराज चव्हाण यांच्यामुळेच कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची सत्ता गेल्याचा आरोपही मंत्री हसन मुश्रीफ यांनी यावेळी केला.
कोल्हापूरात आधुनिक शासकीय वैद्यकीय इमारतीला मंजूरी देण्यात आली आहे. वैद्यकीय रुग्णालयाच्या इमारतीचे भूमिपूजन केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या हस्ते होणार आहे. कोल्हापूरातील शेंडा पार्क येथे 30 एकर जागेत ही नवी इमारत उभारली जाणार आहे. 1100 बेडचे सुसज्ज हॉस्पिटल उभारणार, मेडिकल हब उभे केले जाणार असल्याचे हसन मुश्रीफ यांनी सांगितले. सीपीआरची जुनी इमारत डागडुजी करण्यासाठी 46 कोटी मंजूर केले असल्याचे देखील मुश्रीफ यांनी सांगितले.
स्वाभीमानी संघटनेने दरवर्षी आंदोलन करण्याची गरज नाही. लोकांच्या भावनेशी खेळून आंदोलन होऊ नये. वास्तव वेगळे आहे, उसाला पैसे मिळावेच यासाठी लोकांच्या भावना तीव्र आहेत. सरकार त्यासाठी काम करीत असल्याचे मुश्रीफ यांनी यावेळी सांगितले