मुंबई: आज मुंबईमध्ये (Mumbai) दोन दसरा मेळावे पार पडणार आहेत, एक म्हणजे शिंदे गटाचा दसरा मेळावा आणि दुसरा शिवाजी पार्कवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा मेळावा होणार आहे. गेल्या एका महिन्यापासून दसरा मेळाव्यावरून आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण सुरू आहे. आज दसरा मेळाव्याच्या दिवशीसुद्धा दोन्ही गटातील नेत्यांची एकोमेकांविरोधात टीका सुरूच आहे. शिंदे गटाचे नेते मंत्री संदीपन भुमरे (Sandipan Bhumre) यांनी दसरा मेळाव्यावरून उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला आहे. ठाकरेंकडे आता फक्त गद्दार आणि नमक हराम शद्ब उरलेत असा घणाघात संदीपान भुमरे यांनी केला आहे. यावेळी त्यांनी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यावर देखील जोरदार टीका केली आहे. आमच्या विरोधात भुंकण्यासाठी अंबादास दानवेंना पद दिल्याची टीका भुमरे यांनी केली आहे.
दरम्यान यावेळी बोलताना संदीपान भुमरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा ऐतिहासिक होणार असल्याचा दावा केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सभेला जागा पुरणार नाहीत इतके लोक येणार असल्याचं संदीपान भुमरे यांनी म्हटलं आहे. राज्यभरातून एकनाथ शिंदे यांच्या सभेला लोक येणार असल्याचं भुमरे यांनी म्हटलं आहे.
एकनाथ शिंदे सभेत नेमकं काय बोलणार याबाबत संदीपान भुमरे यांना प्रश्न विचारण्यात आला होता. याबाबत बोलतान भुमरे यांनी म्हटलं आहे की, एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रराच्या विकासावर चर्चा करतील. दसरा मेळाव्यासाठी आलेल्या शिवसैनिकांना एकनाथ शिंदे मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती यावेळी संदीपान भुमरे यांनी दिली आहे.