मुंबई : काँग्रेसच्या नेत्या आणि राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी भाजपच्या नेत्या आणि केंद्रीय महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी यांची भेट घेतली. यावेळी ठाकूर यांनी इराणी यांच्याकडे केंद्र शासनाच्या 2020-21 मधील एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत पूरक पोषण कार्यक्रमासाठी 2003 कोटी 91 लाख रुपयांच्या सुधारित आराखड्यास मान्यता देऊन तातडीने निधी देण्याची मागणी केली. कोरोना परिस्थितीमुळे लाभार्थ्यांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे सुधारित आराखडा करणे भाग पडले. पूरक पोषण कार्यक्रम सुरळीत ठेवण्यासाठी हा निधी वेळेत मिळणे अत्यंत आवश्यक आहे, असंही ॲड. ठाकूर यावेळी म्हणाल्या (Minister Yashomati Thakur meet Minister Smriti Irani in Delhi).
राज्याच्या महिला व बालविकास विभागाच्या केंद्रीय मंत्रालयाकडे प्रलंबित असलेल्या विषयांच्या अनुषंगाने मंत्री ॲड. ठाकूर यांनी आज दिल्ली येथे इराणी यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेतली. यावेळी केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालयाचे सचिव राम मोहन मिश्रा, राज्याच्या महिला बालविकास विभागाच्या सचिव इद्झेस कुंदन, एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्त इंद्रा मालो, महिला व बालविकास आयुक्त डॉ. ऋषिकेश यशोद उपस्थित होते.
Met Smt. @AdvYashomatiINC Ji & officials of Maharashtra Women & Child Development Department in presence of @MinistryWCD senior officials to discuss various issues pertaining to welfare of women & children. pic.twitter.com/3Y8KngePY9
— Smriti Z Irani (@smritiirani) December 18, 2020
“पूरक पोषणसाठी 2 हजार 3 कोटी रुपयांच्या सुधारित आराखड्यानुसार निधी द्या”
एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत पूरक पोषण कार्यक्रमासाठी राज्य शासनाने केंद्राकडे 2020-21 साठी मार्च 2020 मध्ये 1 हजार 630 कोटी 2 लाख रुपयांचा वार्षिक प्रकल्प अंमलबजावणी आराखडा (एपीआयपी) सादर केला होता. मात्र, कोरोना परिस्थिती निर्माण झाल्याने पूरक पोषण कार्यक्रमाची व्याप्ती वाढवावी लागली आहे.
एप्रिल 2020 पासून पूरक पोषण कार्यक्रमाच्या लाभार्थ्यांच्या संख्येत 7 लाख 27 हजाराहून अधिकची वाढ झाली. अधिकच्या निधीची तरतूद करणे आवश्यक झाले आहे. त्यासाठी सुधारित 2 हजार 3 कोटी 91 लाख रुपयांचा सुधारित वार्षिक प्रकल्प अंमलबजावणी आराखडा ठाकूर यांनी इराणी यांच्याकडे सुपूर्त केला. तसेच त्यास मान्यता देण्याची विनंती केली. राज्य शासनाने या कार्यक्रमासाठी यावर्षी 1 हजार 700 कोटी रुपयांची तरतूद केली असल्याचेही यावेळी ठाकूर यांनी सांगितले.
या काळात महानगरांमध्ये काम करणारे मजूर आपल्या मूळ गावी स्थलांतरित झाल्याने पूरक पोषणच्या लाभार्थ्यांमध्ये वाढ झाली. तसेच काही कुटुंबे राज्यांतर्गत ग्रामीण भागात स्थलांतरित झाली असून ते पूरक पोषण कार्यक्रमाचा लाभ घेत आहेत. यापूर्वी एकात्मिक बाल विकास सेवा योजना (आयसीडीएस) सेवांचा लाभ घेत नसलेले घटकही आता या योजनेचा लाभ घेत आहेत.
कोरोना महामारीच्या कालावधीमध्ये सर्व शाळा बंद झाल्यामुळे खासगी शालेय पूर्व अभ्यासक्रमात (प्ले स्कूल) शिकत असलेली 3 ते 6 वर्षे वयोगटातील जी बालके आयसीडीएस सेवांचा लाभ घेत नव्हती त्यांनाही सध्या पूरक पोषण आहार कार्यक्रमाचा लाभ दिला जात आहे. त्यामुळे लाभार्थ्यांच्या संख्येत एप्रिल 2020 पासून 7 लाख 27 हजाराहून अधिकची वाढ झाली आहे, असे सांगून सुधारित आराखड्यानुसार अधिकची तरतूद व्हावी, अशी मागणीदेखील ॲड. ठाकूर यांनी केली आहे.
15 व्या वित्त आयोगानुसार 554 कोटी रुपये निधी तातडीने द्यावा
केंद्र शासनाने पंधराव्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार पोषण कार्यक्रमांतर्गत नाविन्यपूर्ण योजना राबविण्यासाठी राज्याला 554 कोटी रुपये मंजूर केले आहेत. राज्य शासनाने त्यासाठी 277 कोटी रुपयांची तरतूदही केली आहे. तथापि, केंद्र शासनाने अद्याप तरतूद वितरित केली नाही. पूरक पोषणासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेणे शक्य व्हावे यासाठी हा निधी तातडीने मिळणे आवश्यक आहे, असेही ॲड. ठाकूर यांनी मंत्री इराणी यांना यावेळी सांगितले.
हेही वाचा :
कोरोना काळात अंगणवाडी सेविकांची मोलाची कामगिरी, राज्य सरकारकडून दोन हजार रुपये दिवाळी भेट
‘एका महिलेच्या मागे आता अख्खा भाजप लागेल’, यशोमती ठाकूर यांचा भाजपवर हल्लाबोल
मंत्री यशोमती ठाकूर यांना दिलासा, पोलीस कॉन्स्टेबल मारहाण प्रकरणी तीन महिन्यांच्या शिक्षेला स्थगिती
Minister Yashomati Thakur meet Minister Smriti Irani in Delhi