मीरा भाईंदरचं महापौरपद भाजपने राखलं, मात्र पाच भाजप नगरसेवकांचं शिवसेनेला मतदान

| Updated on: Feb 26, 2020 | 2:54 PM

भाजपचं संख्याबळ 61 असतानाही भाजप उमेदवाराची मतसंख्या 55 वर आली. परंतु बहुमताचा आकडा 48 असल्यामुळे सत्ताधारी भाजपचं पारडं जड राहिलं.

मीरा भाईंदरचं महापौरपद भाजपने राखलं, मात्र पाच भाजप नगरसेवकांचं शिवसेनेला मतदान
Follow us on

मीरा भाईंदर : मीरा भाईंदरच्या महापौरपदी भाजपच्या ज्योत्स्ना हसनाळे, तर उपमहापौरपदी भाजपच्या हसमुख गेहलोत यांची निवड झाली आहे. ज्योत्स्ना हसनाळे 55 मतं मिळवत विजयी झाल्या. भाजपच्या पाच नगरसेवकांनी शिवसेनेला मतदान करुनही मीरा भाईंदरच्या महापौरपदी भाजपचा उमेदवार विराजमान झाला. (Mira Bhaindar Mayor Jyotnsa Hasnale)

शिवसेनेकडे 22, काँग्रेसकडे 12 नगरसेवक आहेत. परंतु शिवसेना नगरसेविका दीप्ती भट आणि अनिता पाटील तर काँग्रेस नगरसेविका सारा अक्रम खान अनुपस्थित राहिल्याने मतदानावेळी सभागृहात महाविकास आघाडीचं संख्याबळ 31 वर पोहचलं. परंतु भाजपच्या पाच नगरसेवकांच्या मतांमुळे महाविकास आघाडीकडून असलेले शिवसेना उमेदवार अनंत शिर्के यांना 36 मतं मिळाली.

भाजपच्या मोरस रॉड्रिंक्स, अश्विन कसोदरिया, वैशाली रकवी, परशुराम म्हात्रे आणि गीता जैन या पाच नगरसेवकांनी शिवसेना उमेदवाराला मतदान केलं. भाजप नगरसेवक विजय राय अनुपस्थित राहिल्याने 61 संख्याबळ असतानाही भाजप उमेदवाराची मतसंख्या 55 वर आली. परंतु बहुमताचा आकडा 48 असल्यामुळे सत्ताधारी भाजपचं पारडं जड राहिलं.

काँग्रेस नगरसेविका स्ट्रेचरवरुन महापालिकेत

काँग्रेस नगरसेविका उमा सपार आजारी असल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून खाजगी रुग्णालयात उपचार घेत होत्या. मात्र महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीत प्रत्येक मत महत्त्वाचं असल्यामुळे सपार मतदानासाठी रुग्णालयातून महापालिकेत दाखल झाल्या. रुग्णवाहिकेने हॉस्पिटलपासून महापालिकेपर्यंतचा प्रवास केल्यानंतर त्यांना स्ट्रेचरमधून खाली उतरवण्यात आलं. त्यानंतर व्हिलचेअरवर बसवून त्यांना महापालिकेत नेण्यात आलं.

मीरा भाईंदर महापौरपदासाठी भाजपकडून ज्योत्स्ना हसनाळे, तर महाविकास आघाडीकडून शिवसेनेच्या अनंत शिर्के यांनी अर्ज दाखल केले होते. तर उपमहापौरपदासाठी भाजपकडून मदन सिंह, तर ‘मविआ’तर्फे मर्लिन डिसा रिंगणात होते.

 

Mira Bhaindar Mayor Jyotnsa Hasnale