मिझोरम | 6 डिसेंबर 2023 : मिझोराम विधानसभेच्या इतिहासात एक नवा विक्रम रचला गेलाय. गेल्या वेळी झालेल्या निवडणुकीत 40 सदस्यांच्या मिझोराम विधानसभेत एकही महिला आमदार निवडून आली नव्हती. 7 नोव्हेंबर रोजी मिझोराम विधानसभेच्या 40 जागांवर मतदान झाले होते. 4 डिसेंबरला निकाल लागला. या निवडणुकीत महिलांनी एक वेगळा इतिहास निर्माण केलाय. मिझोराममध्ये झोराम पीपल्स मुव्हमेंट पार्टीला दणदणीत विजय मिळाला आहे. झेडपीएमने 27 जागा जिंकल्या. तर, सत्ताधारी पक्ष मिझोरम MNF पार्टीला केवळ 10 जागा मिळाल्या आहेत. याशिवाय भाजपने 2 तर काँग्रेसने एक जागा जिंकली आहे.
मिझोराम विधानसभेत पहिल्यांदाच तीन महिला आमदार निवडून आल्या आहेत. मिझोराम राज्याची स्थापना झाल्यापासून आतापर्यंत येथे केवळ चारच महिला आमदार झाल्या आहेत. गेल्या विधानसभेत एकाही महिला आमदार नव्हती. मिझोराम राज्याने महिला साक्षरतेमध्ये अव्वल अशा केरळलाही मागे टाकले आहे. येथील अनेक अनुसूचित जमातींमध्ये मातृसत्ताक पद्धती अस्तित्वात आहे. तरीही महिलांची अशी अवस्था आहे.
मिझोराममधील महिलांची हीच परिस्थिती बदलण्याचा विडा ३२ वर्षीय तरुण महिला आमदार बरील वेनिसांगी यांनी उचलला आहे. बरील वेनिसांगी झोराम पीपल्स मूव्हमेंट (ZPM) पक्षातून आयझॉल दक्षिण – III मतदारसंघातून विजयी झाल्या आहेत. बरील वेनिसांगी या आयझॉल मिझोराम कौन्सिलमध्ये नगरसेवक होत्या. त्यांना झोराम पीपल्स मूव्हमेंटने आमदारकीची उमेदवारी दिली आणि त्या मोठ्या मताधिक्याने निवडून आल्या. याच बरील यांनी प्रचारादरम्यान महिलांविषयी तसेच महिला आमदारांविषयी असणारे पूर्वग्रह बदलायचे आहेत, असे विधान केले होते. आता निवडणूक जिंकल्यानंतर बेरिल यांनी हीच एक मोठी लढाई हाती घेतली आहे.
आम्ही पुरुषप्रधान समाजामध्ये जन्माला आलो, त्यांच्यामध्ये वाढलो. आम्ही जुन्कून आलो तरी पुरुषी सत्तेचं ऐकतील असे लोकांना वाटते. परंतु, असे काही होणार नाही. जिथे महिलांवर अन्याय होईल तिथे आम्ही आवाज उठवू. महिलांचे पूर्ण प्रतिनिधित्व मो करणार आहे असे त्या म्हणाल्या आहेत. महिलांच्या उत्थानाबद्दल मी कार्य करणार आहे. महिलांना हवे ते त्या आता करू शकतात. त्यांच्यावर कुणीही बंधने घालू शकत नाही. लिंगभेदाविरोधात त्या बोलू शकतात. महिला आपली स्वप्ने पूर्ण करू शकतात. त्यांच्या आवडीनुसार काहीही करू शकतात असे आमदार बेरिल यांनी सांगितले.
बरील पुढे म्हणाल्या की, जर महिलांना काही साध्य करायचे असेल तर त्यांनी ते केले पाहिजे. मी माझा विजय परिवर्तनासाठी मतदान करणाऱ्यांना समर्पित करते. लोकांना येथे बदल हवा होता ज्यामुळे सर्वच क्षेत्रात विकास होऊ शकेल. त्यामुळे या विजयाचे श्रेय मी त्या सर्वांना देते. वैयक्तिक हितगुज, घराणेशाही आणि भ्रष्टाचार यापासून दूर राहून राज्याच्या विकासासाठी सर्वांनी पुढे यावे. आमच्यासोबत हातमिळवणी करावी, असे आवाहनही बरील यांनी केले.