गजानन उमाटे, नागपूरः आमदारांनी खोके अर्थात पैसे घेऊन सरकार स्थापन केलं, असा आरोप करणाऱ्या रवी राणा (Ravi Rana) यांना प्रहार जनशक्ती संघटनेचे आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी थेट आव्हान दिलंय. विशेष म्हणजे रवी राणा यांच्या आरोपांवरून त्यांनी थेट मुख्यमंत्री (Chief Minister) आणि उपमुख्यमंत्री यांनाही नोटीस पाठवण्याचं वक्तव्य केलंय. 1 नोव्हेंबरपर्यंत या प्रश्नाचं उत्तर नाही मिळालं तर मोठा गौप्यस्फोट करेन, असा इशाराही बच्चू कडू यांनी दिलाय.
त्यानंतर माझे फुसके फटाके आहेत की बॉम्ब आहे हे कळेल, असं वक्तव्य बच्चू कडू यांनी केलंय. रवी राणा यांनी केलेल्या आरोपांवरून खवळलेल्या आमदारांनी आज टीव्ही9 वर परखडपणे भूमिका मांडली.
हा वाद माझ्यापुरता मर्यादीत नाही. पैसे देऊन सरकार स्थापन झाले का? मग मला पैसे कुणी दिले? सर्व आमदारांनी अडचणीत आणणारे हे आरोप आहेत. आ. रवी राणा यांनी केलेले आरोप मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर सुद्धा आहेत, त्यामुळे हे आरोप कायमचे मिटले पाहिजेत, अशी भूमिका त्यांनी मांडली.
खासदार नवनित राणा यांना गेल्या लोकसभा निवडणूकीत राष्ट्रवादी – काँग्रेसने पाठिंबा दिला. मग तोही पैसे देऊन केला का? असा सवाल बच्चू कडू यांनी केलाय.
उद्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना कायदेशीर नोटीस पाठवणार आहे. या नोटीसीत त्यांना विचारणार की मला पैसे कुणी दिले? मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना वकीलामार्फत नोटीस देणार असून आज नोटीस तयार होईल, अशी माहिती बच्चू कडू यांनी दिली आहे.
माझा इशारा फुसका बार आहे की बॅाम्ब आहे, हे 1 तारखेला दाखवू. कसा कुणाच्या खाली लावायचा बॅाम्ब हे बच्चू कडू ला चांगलं माहित आहे.. मी नंगा होईल मला त्याचं काही फरक पडत नाही, माझं राजकारण चुलीत गेलं तरी चालेल, असा निर्वाणीचा इशारा बच्चू कडू यांनी दिलाय.
आम्ही रस्त्यावर आलो राजकारण सोडावं लागलं तरिही बेहत्तर, उद्या राजीनामा द्यावा लागला तरी चालेल, आम्ही त्याला आरपार करतो. ही आरपारची लढाई आहे. आम्ही जमिनीत नांगर घालणाऱ्यांची औलाद आहे. आम्ही नांगर घालून टाकू. ज्यांनी पडिक जमिन केली तिथे नांगर घालू, अशा इशारा बच्चू कडू यांनी दिलाय.