मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेतून (sivsena) बंडखोरी केली आहे. ते विधान परिषदेचा निकाल लागल्यापासून नॉटरिचेबल होते. त्यानंतर मंगळवारी दिवसभर त्यांचा मुक्काम सुरतमधील एका हॉटेलमध्ये होता. या हॉटेलबाहेर गुजरात पोलिसांनी तगडा बंदोबस्त तैनात केला होता. त्यानंतर आता एकनाथ शिंदे हे आसामला पोहोचले आहेत. त्यांच्यासोबत शिवसेनेचे 35 आमदार असल्याचा दावा करण्यात येत आहे. यामुळे शिवसेनेत उभी फूट पडली असून, महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi government) कोसळणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे यांच्यासोबत एकट्या शिवसेनेचेच नाही तर बच्चू कडू आणि त्यांच्या प्रहार संघटनेचा एक आमदार देखील आहे. जेव्हा हे बंडखोर आमदार प्रसारमाध्यमांसमोर आले तेव्हा त्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर काहींनी बोलणे टाळले आहेत. पाहुयात नेमंक कोण काय म्हटलं.
मला तब्बल 40 आमदारांचा पाठिंबा असून, माझ्याकडे आहे तीच खरी शिवसेना आहे. असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे. तसेच आज एकनाथ शिंदे विशेष विमानाने मुंबईत दाखल होऊन राज्यपालांची भेट घेणार आहेत. यामुळे महाविकास आघाडीचे सरकार संकटात सापडले आहे. दुसरीकडे एकनाथ शिंदे बोलत असताना कॅमेऱ्यात बच्चू कडू देखील स्पॉट झाले आहेत. बच्चू कडू या व्हिडीओमध्ये हसताना दिसत आहेत. त्यांच हसू हेच सर्व काही सांगून जात आहे.
याच घडामोडीदरम्यानचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये कॅमेऱ्यासमोर येताच एक बंडखोर आमदार आपला चेहरा झाकून घेण्याचा प्रयत्न करत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून, नेटकऱ्यांकडून या व्हिडीओवर विविध प्रतिक्रिया येत आहेत.
शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार देखील या बंडखोर आमदारांसोबत आहेत. त्यांचा देखील एक व्हीडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये पत्रकार त्यांना काही प्रश्न विचारत आहेत. मात्र आपल्याला बिर्याणी खाण्यासाठी जायचे असल्याचे या व्हिडीओमध्ये सत्तार यांनी म्हटले आहे. दरम्यान आज एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांना पत्र दिल्यानंतर राज्यपाल महाविकास आघाडीला बहुमत सिद्ध करायला लावण्याची शक्यता आहे.