नागपूर : राज्याचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरु आहे. पण यंदाच्या अधिवेशनामध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची क्रेझ दिसत नसून आमदार देवेंद्र भुयार यांची क्रेझ दिसत आहे. देवेंद्र भुयार (MLA Devendra Bhuyar) हे मोर्शी मतदारसंघातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून निवडून आलेले आहेत.
देवेंद्र (MLA Devendra Bhuyar) यंदाच्या हिवाळी अधिवेशनात तरुणाईचे ताईत बनले आहेत. जसे कार्यकर्ते आणि लोक गर्दी करत आहेत. तसेच देवेंद्र यांना भेटण्यासाठी राज्यातील इतर युवा आमदारही त्यांना भेटण्यासाठी येत आहेत. त्यामुळे या अधिवेशनात देवेंद्र यांची क्रेझ दिसत आहे. तरुणांनाही त्यांच्यासोबत सेल्फी घेण्याचा मोह आवरत नाही.
विशेष म्हणजे देवेंद्र लोकवर्गणीतून निवडून आलेले आमदार आहेत. तसेच देवेंद्र भुयार आपल्या साध्या राहणीमानाने विधानभवन परिसरात चर्चेत आहेत. देवेंद्र भुयार आगामी काळात सभागृहात आक्रमकपणे शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर प्रश्न मांडणारा नवा चेहरा म्हणून पुढे येऊ शकतात.
छोटे मोठे आंदोलन करत, जिल्हा परिषद सदस्यपदाहून थेट आमदारकीपर्यंत पोहचणारे देवेंद्र भुयार यांनी राजकारणात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. त्यामुळे तरुण वर्गात त्यांची क्रेझ निर्माण झाली आहे.