वर्धा : विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आणि सत्तास्थापनेच्या रणधुमाळीला नव्यानं सुरुवात झाली आहे. दुसरीकडे निवडणूक काळात पक्षासाठी कोणी काम केलं आणि कोणी विरोधात भूमिका घेतल्या याबाबतही अनेक खुलासे (MLA Ranjit Kamble on rebellion candidate) होत आहेत. वर्ध्यातील देवळी विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस आमदार रणजित कांबळे यांनी (MLA Ranjit Kamble on rebellion candidate) देखील असाच काहीसा खुलासा केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही जणांनी आघाडीच्या उमेदवाराच्या विरोधात काम केल्याचा आरोप कांबळे यांनी केला आहे. पक्ष सोडून गेलेल्यांना जनतेने जागा दाखवल्याचंही त्यांनी यावेळी नमूद केलं.
रणजित कांबळे म्हणाले, “राष्ट्रवादीच्या खर्या कार्यकर्त्यांनी आघाडीच्या उमेदवाराचं काम केलं. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही लोकांनी आघाडीचं काम केलं नाही. मागेपुढे पक्ष त्यांच्यावर कारवाई करेल.” या पक्षातून त्या पक्षात जाणाऱ्यांना जनता माफ करत नाही. अशा लोकांना जनता निवडणुकीत जागा दाखवते, असंही कांबळे यांनी नमूद केलं.
“पक्ष सोडून गेलेल्यांना जनतेने जागा दाखवली”
आमदार रणजित कांबळे म्हणाले, “जे पक्षाशी प्रामाणिक राहिले नाही, त्यांना याचे दुष्परिणाम भोगावे लागतात. राज्यातील 23 उमेदवार काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून शिवसेना, भाजपमध्ये गेले. त्यातील 19 उमेदवार निवडणुकीत पडले. केवळ 4 जण निवडून आले. जनता असं पक्षांतर कधीही सहन करत नाही. या निकालातून जनतेने पक्ष सोडून गेलेल्यांना जागा दाखवली आहे.”
देवळी विधानसभा मतदारसंघातील लढत यावेळी लक्षवेधक होती. काँग्रेसचे विद्यमान आमदार पाचव्यांदा रिंगणात होते. त्यांच्याविरोधात ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत आलेले समीर देशमुख शिवसेना-भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार होते. त्यामुळे भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश बकाणे यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उडी घेतली होती. या निवडणुकीत काँग्रेसचे रणजित कांबळे यांनी 36 हजारांच्या मताधिक्याने विजय मिळवला.