तोडपाणीवरून शिंदे-फडणवीस समर्थक दोन आमदारांची धुसफूस सुरूच; राणा म्हणाले, कितीही गुन्हे दाखल करा, मी भीक घालत नाही!

| Updated on: Oct 24, 2022 | 2:34 PM

बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातील वाद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मिटवणार आहेत. राणा आणि बच्चू कडू यांना शिंदे आणि फडणवीसांनी फोन करून त्यांना समजावल्याचं सांगितलं जातं.

तोडपाणीवरून शिंदे-फडणवीस समर्थक दोन आमदारांची धुसफूस सुरूच; राणा म्हणाले, कितीही गुन्हे दाखल करा, मी भीक घालत नाही!
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

अमरावती: शिंदे समर्थक आमदार बच्चू कडू (bacchu kadu) आणि भाजप समर्थक आमदार रवी राणा (ravi rana) यांच्यात ऐन दिवाळीत टीकेचे फटाके फुटत आहेत. दोघांनीही एकमेकांवर शब्दांचे बॉम्ब टाकायला सुरुवात केली आहे. बच्चू कडू यांनी राणा यांच्यावर किराणा सामान वाटपावरून टीका केली. त्याला प्रत्युत्तर देताना राणा यांनी बच्चू कडू यांनी खोके घेतल्याचा आरोप केला. त्यामुळे बच्चू कडू संतापले असून त्यांनी राणा यांच्याविरोधात पोलिसात (police) तक्रार दाखल केली आहे. खोक्यांचा हा तीर थेट सरकारला लागला आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोन्ही नेत्यांमध्ये समेट घडवून आणणार आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी फोन केल्यानंतरही राणा माघार घ्यायला तयारी नाहीत. त्यांनी पुन्हा एकदा बच्चू कडू यांच्यावर टीका केली आहे.

आमदार रवी राणा यांची आमदार बच्चू कडू यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे. माझा कुणाशीही वाद सुरू नाही. माझ्यावर टीका केली जाते. त्याचा हिशोब जनता करेल. माझ्यासाठी उपोषण करण्यापेक्षा दिव्यांगासाठी उपोषण करा. कितीही गुन्हे दाखल करा, मी भीक घालत नाही, असं आव्हानच रवी राणा यांनी बच्चू कडू यांना नाव न घेता दिलं आहे.

हे सुद्धा वाचा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही आमचेच आहेत. त्यांचा जो आदेश आहे तो माझ्यासाठी सर्वस्व आहे. त्यांच्या आदेशाचे मी पालन करतो. मी बोललो ते सत्य आहेच. खालच्या थराची भाषा वापरणे ही महाराष्ट्रची संस्कृती नाही. स्वतःला सत्यवादी समजणाऱ्यांना जनता धडा शिकवेल. खोट पण रेटून बोलण्याचा प्रयत्न ते करत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.

दरम्यान, बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातील वाद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मिटवणार आहेत. राणा आणि बच्चू कडू यांना शिंदे आणि फडणवीसांनी फोन करून त्यांना समजावल्याचं सांगितलं जातं. दिवाळी झाल्यावर लवकरच बच्चू कडू, राणा यांनी शिंदे आणि फडणवीस बोलावून घेणार आहेत. त्यांच्यासोबत बैठक घेऊन चर्चा करून दोघांचंही मनोमिलन करणार असल्याचं सांगितलं जात आहे.

गुवाहाटीला जाऊन बच्चू कडू यांनी पैसे घेतल्याचा रवी राणा यांनी केला होता. राणा हे सत्तेच्या वर्तुळातील आमदार आहेत. त्यांनीच हा गंभीर आरोप केल्याने बच्चू कडू संतापले आहेत. हा आरोप जिव्हारी लागल्याने त्यांनी राणा यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. त्यामुळेच हा वाद आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या दरबारात गेल्याचं सांगितलं जात आहे.