मुंबई : शिवसेनेविरुद्ध (Shivsena) आक्रमक आमदार रवी राणा (Ravi Rana) आणि खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांची आज जेलमध्ये रवानगी करण्यात आली आहे. रावी राणा यांची तळोजा रोड जेलमध्ये रवानगी करण्यात आली आहे. तर नवनीत राणा यांची आर्थर रोड जेलमध्ये रवानगी करण्यात आली आहे. मातोश्री आणि शिवसेनाबाहेर हनुमान चालीसा पठण करण्याचा आग्रह राणा कुटुंबाने धरला होता. त्यानंतर शिवसेनाही त्यांच्याविरोधात चांगलीच आक्रमक झाल्याचे दिसून आले. शिवसेनेकडूनही राणा कुटुंबियांच्या घरावर आक्रमक आंदोलन करण्यात आले. याच दरम्यान राणा कुटुंबियांनी राज्याचा आणि मुख्यमंत्र्यांचा अपमान केला आसल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याने त्यांच्या अडचणीत आता चांगलीच वाढ झाली आहे.
राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवासांपासून हिंदूत्व आणि हनुमान चालीस या मुद्द्यावरून ठिणग्या उडत आहे. यावरून पुन्हा विरोधक आणि महाविकास आघाडी आमनेसामने आले आहेत. रवी राणा यांनीही सुरूवातीपासूनच शिवसेनेविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. शिवेसेनेने आपल्यावर अनेकदा खोटे गुन्हा दाखल करून आपल्याला अडकवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप रवी राणा यांच्याकडून वारंंवर करण्यात आलाय तर खासदार नवनीत राणा याही अनेकदा महाविकास आघाडी आणि ठाकरे सरकारवर हल्लाबोल चढवताना दिसून आलेत. आता राणा यांना अटक झाल्याने हा संघर्ष टोकाला पोहोचला आहे.
आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांच्यावर झालेल्या कारवाईवरून भाजप नेत्यांकडून आणि राणा दाम्पत्याकडूनही जोरदार आरोप होत आहेत. शिवसेना ही गुंडगिरी पद्धतीने आमच्यावर हल्ले करत आहे. आम्हाला अडकवण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप हा राणा यांच्याकडून करण्यात येत आहे. तर शिवसेनेच्या काळात राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राहिली नाही, असे भाजप नेते म्हणत आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तर यावरून थेट राष्ट्रपती राजवटीची भाषा केली आहे. राणा यांना भेटण्यासाठी गेलेल्या किरीट सोमय्या यांच्यावरही हल्ला झाल्याने हे प्रकरण आणखी तापलं आहे. यावरूनच आता भाजप नेते उद्या दिल्लीत दाखल होत केंद्रीय गृह सचिवांकडे याबाबत तक्रारही करणार आहेत. त्यामुळे आगामी काळातही हा संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता आहे.