औरंगाबाद : शिवसेनेचे (shiv sena) बंडखोर आमदार संदिपान भूमरे (Sandipan Bhumre) हे पंधरा दिवसांनी आपल्या घरी परतले आहेत. त्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया देताना शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. आम्ही गद्दारी केली नाही आम्ही राज्यसभेत आणि विधानपरिषदेत पक्षांनी सांगितलेल्या उमेदवाराला मतदान केलं. संजय राऊत यांच्यामुळे आम्ही आमदार नाही झालो तर आमच्यामुळे संजय राऊत खासदार झाले आहेत. संजय राऊत हे उरलेली सेना देखील संपवणार आहेत. राऊत यांच्यामुळेच हे बंड झालं. या सगळ्या प्रकाराला संजय राऊत हेच जबाबदार आहेत, अशी घणाघाती टीका संदिपान भूमरे यांनी केली आहे. तसेच शिवसेनेत जे लोक सध्या शिल्लक आहेत त्यातील अनेक जण आमच्या संर्पकात असल्याचा दावा देखील भूमरे यांनी केला आहे.
पुढे बोलताना भूमरे म्हणाले की, आज पंधरा दिवसानंतर आम्ही घरी आलो आहोत. घरापासून दूर होतो, एकनाथ शिंदे साहेबांनी आदेश दिला आणि आम्ही विचार न करता त्यांच्यासोबत गेलो. आम्ही पैसा किंवा पदाच्या लालसेने गेलो नव्हतो, पैशांना मी आयुष्यात कधीही महत्त्व दिलेलं नाही. आम्ही शिंदे साहेबांसाठी गेलो. उध्दव ठाकरे यांच्या जवळचे लोक आम्हाला भेटू देत नव्हते आमचे कामं होत नव्हते. राष्ट्रवादी काँग्रेस आम्हाला अडचणीत आणत होती, त्यामुळे हे बंड करावं लागलं. आता उद्धव ठाकरे हे रोज बैठका घेतात. सेनाभवनला जातात. त्यांनी हेच जर आधी केलं असतं आम्हाला भेट दिली असती, आमचे प्रश्न सोडवले असते तर आज ही वेळ आली नसती असं भूमरे यांनी म्हटले आहे.
जे आमदार शिवसेनेशी बंडखोरी करत शिंदे गटात सहभागी झाले आहेत, त्या आमदारांना केंद्राकडून वाय दर्जाची सेवा पुरवण्यात येत आहे. मात्र संदिपान भूमरे यांनी ही सुरक्षा नाकारली आहे. सुरक्षेची गरज नसल्याचे संदिपान भूमरे यांनी म्हटले आहे. भूमरेंपूर्वी गुलाबराव पाटलांनी देखील असाच आरोप केला होता. आमच्या नेत्यांना भेटू दिले जात नसल्याचे पाटील यांनी म्हटले होते. तसेच त्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर देखील निशाणा साधला होता.