बीड : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बीड जिल्ह्यातील केजच्या आमदार संगिता ठोंबरे (MLA Sangeeta Vijayprakash Thombre) यांना कोर्टाने दणका दिलाय. बनावट स्वाक्षरी करुन फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश कोर्टाने जारी केले आहेत. संगिता ठोंबरे (MLA Sangeeta Vijayprakash Thombre) यांच्यासह त्यांचे पती विजय प्रकाश ठोंबरे यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात यावा, असे आदेश कोर्टाने दिले.
आमदार संगिता ठोंबरे प्रवर्तक आणि त्यांचे पती अध्यक्ष असलेल्या लोकनेते गोपीनाथ मुंडे सहकारी मागासवर्गीय सुतगिरणीच्या संचालक मंडळावरील व्यक्तीच्या तक्रारीवरुन हा प्रकार उघडकीस आला. गनपती कांबळे या व्यक्तीचं नाव सुतगिरणीच्या संचालक मंडळावर असून त्यांच्या विविध प्रस्तावांवर बनावट सह्या करुन सरकारकडून निधी लाटल्याचा आरोप करत कांबळे यांनी पोलिसांकडे अर्ज केला होता. तक्रारीची दखल न घेतल्यामुळे त्यांनी कोर्टात धाव घेतली.
गनपती कांबळे यांच्या संमतीशिवाय त्यांना सुतगिरणी संचालकपदी नेमण्यात आलं. शिवाय त्यांच्या बनावट सह्या करताना ‘गणपती’ असा ऊल्लेख करण्यात आला. पण न लिहिताना चुकलं आणि तेच सर्व प्रकरण समोर आणण्यास महत्त्वाचं ठरलं. कांबळे यांच्या खऱ्या स्वाक्षरीत गनपती असा ‘न’ असल्याचं अधोरेखित करत फॉरेन्सिक हस्ताक्षर तज्ञांनी सुतगिरणीच्या विविध कागदपत्रांवरील गनपती कांबळेंची स्वाक्षरी खोटी असल्याचा निर्वाळा दिला.
विधानसभा निवडणूक तोंडावर असताना संगिता ठोंबरे यांच्या अडचणी वाढणार आहेत. कारण, लोकसभा निवडणुकीच्या काळात त्यांना भाजप कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं होतं. नुकतंच थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडूनच आपलं तिकीट फायनल झाल्याची चर्चाही ठोंबरेंच्या समर्थकांमध्ये होती. त्यामुळे स्थानिक राजकारण तापलं होतं.