PHOTO | अडीच महिन्यांचं बाळ हाती, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची थेट भेट, मागणंही मांडलं, हिवाळी अधिवेशनातली घटना काय?

| Updated on: Dec 19, 2022 | 3:20 PM

राज्याच्या विधिमंडळात पहिल्यांदाच अशी घटना घडत असल्याने त्यांच्या कुटूंबियांची आणि बाळाची देखील अस्थापूर्वक चौकशी केली.

PHOTO | अडीच महिन्यांचं बाळ हाती, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची थेट भेट, मागणंही मांडलं, हिवाळी अधिवेशनातली घटना काय?
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नागपूरः हिवाळी अधिवेशनाच्या (Winter session) पहिल्याच दिवशी एका घटनेनं आज महाराष्ट्राचं लक्ष वेधलं. विधानभवन परिसरात आज अडीच महिन्यांच्या बाळाचं आणि त्याच्या आईचं जोरदार कौतुक झालं. स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी त्यांच्या दालनात या माता आणि बाळाला बोलावून त्यांचं स्वागत केलं. ही माता म्हणजे आमदार सरोज अहिरे (Saroj Ahire). हिवाळी अधिवेशनात सर्वच आमदारांनी सक्रिय सहभाग नोंदवणं हे कर्तव्य असतं. सरोज अहिरे यांचं बाळ अडीच महिन्यांचं असूनही त्यांनी हिवाळी अधिवेशनात उत्साहाने हजेरी लावली.

नाशिक जिल्ह्यातील देवळाली येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सरोज अहिरे त्यांच्या अडीच महिन्यांच्या बाळाला घेऊन विधानभवनात आल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना आपल्या दालनात बोलवून त्यांच्या कुटूंबियांची भेट घेतली. तसेच त्यांच्या या कृतीचे जाहीर कौतुक केले.

राज्यात कोणतही सरकार असलं तरी मतदारसंघातील प्रश्न सोडवणं महत्त्वाचं आहे. त्यासाठी मी बाळाला घेऊन इथे आले. विधान भवन परिसरात फिडिंग रुम किंवा हरकणी कक्ष असावा, अशी मागणी मी आणि नमिताताई मुंदडा यांनी केल्याची प्रतिक्रिया सरोज अहिरे यांनी दिली.

विधिमंडळात लोकप्रतिनिधी म्हणून कायदे बनवणे आणि विधिमंडळाच्या बाहेर मातृत्वाची जबाबदारी पार पाडणे हे निश्चितच आव्हानात्मक आहे. या दोन्ही जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडणे म्हणजे म्हणजे स्त्रीमधील कर्तृत्वाचा आणि मातृत्वाचा अनोखा सन्मान असल्याचे मत यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.

राज्याच्या विधिमंडळात पहिल्यांदाच अशी घटना घडत असल्याने त्यांच्या कुटूंबियांची आणि बाळाची देखील अस्थापूर्वक चौकशी केली. यावेळी आमदार संजय बनसोडे आणि आमदार सरोज अहिरे यांचे पती डॉ. प्रवीण वाघ आणि सासुबाई कल्पना वाघ हेदेखील उपस्थित होते.