सातारा: मी कोणालाही व्यक्तिगत नाव ठेवत नाही. एका घरात जर राजकारण शिरलं तर घोटाळा होतोच होतो. आजोबा आमदार, बाप आमदार आणि नातू पण आमदार अशी महाराष्ट्रात दीडशे घराणी आहेत. ही लोकं राजकारणातून हलायला तयार नाहीत. मोहिते पाटील, पतंगराव कदम, बाळासाहेब पाटील, पृथ्वीराज बाबा हलत नाहीत. अशी घराणे नागपूरपासून कोल्हापूरपर्यंत मोजली तर शंभर ते सव्वाशे निघतील. 288 मतदारसंघातले 125 बाजूला काढा. राहिलेल्या खऱ्या निवडणुका. आणि यातूनच ठरवायचं शिवसेना (shivsena) पुढं का भाजप (bjp) पुढं, असं परखड मत शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील (Shahajibapu Patil) यांनी व्यक्त केलं. ते सातारा येथे बोलत होते. शहाजी बापू पाटील यांनी साताऱ्यातील मिलिटरी अपशिंगे येथे एका वाढदिवसानिमित्त हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी राजकारणासह अनेक गोष्टींवर आपल्या भाषणात फटकेबाजी केली.
मुलाखत घेणे हा प्रकार बोगस असतो सर्व आधीच मॅनेज असतं. यामध्ये शरद पवार एकदम भारी… एकाच मतदारसंघात दहा जणांना आधीच कामाला लावतात, असा टोला शहाजी बापू पाटील यांनी लगावला. अपशिंगे गावात सहजासहजी कमळ फुलणार नाही. राष्ट्रवादीवाले खूप चालू आहेत. पण प्रयत्न करत राहायचं. आपण प्रामाणिक प्रयत्न करायचे, असंही ते म्हणाले.
शिंदे गटातील घराणेशाही संपवायची आहे, अशी चिठ्ठी शहाजी बापूंना या कार्यक्रमात आली. त्यावरही त्यांनी मिश्किलपणे उत्तर दिलं. आधी गट तर नीट पडू देत मग बघू. माझं आयुष्य काँग्रेसमध्ये गेलंय. पण मला 5 वर्षात शिवसेना कळाली नाही, असं त्यांनी म्हणताच एकच खसखस पिकली.
सातारा जिल्ह्यातल्या इंदोली गावच्या अशोक पाटील नावाचे रिटायर डीआयजी पोलीस आहेत. त्यांनी मला राजकारण शिकवले. ते मला फिजिक्स शिकवायचे. पण माझ्याकडून होत नसल्याने त्यानी ठरवलं मला पुढारी करायचं. लग्न सुद्धा त्याच व्यक्तीने ठरवलं. आता पण मी त्यांना विचारूनच निर्णय घेतो, असं मिश्किल विधानही त्यांनी केलं.
ऊस तोडीचा टोळ्या, नालासोपारा सारख्या ठिकाणी माती उचलण्याचं काम, गोव्यात गंधकाच्या खाणीत काम करणारे लोक हे सर्व सांगोला तालुक्यातील आहेत. याचे खूप दुःख वाटतं. पण हे सर्व संपवल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. यासाठी मी जिद्दीने निवडणूक लढलो, असं त्यांनी सांगितलं. गुवाहाटीमध्ये गेल्यानंतर डायलॉगचा नेमका काय किस्सा झाला याची खुमासदार माहितीही त्यांनी दिली. तसेच आपल्या चाळीस वर्षाच्या राजकारणात कधीही चुकीचा फोन पोलीस स्टेशनला केला नसल्याचंही त्यांनी सांगितलं.