…यापुढे आम्हाला गुवाहटीला जायची गरज नाही, शहाजी बापू पाटील असं का म्हणाले?

| Updated on: Dec 21, 2022 | 2:40 PM

राज्यातील 7,751 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा निकाल काल लागला. यात भाजप-शिंदे गटाच्या ताब्यात सर्वाधिक ग्रामपंचायती गेल्याचा दावा करण्यात आलाय.

...यापुढे आम्हाला गुवाहटीला जायची गरज नाही, शहाजी बापू पाटील असं का म्हणाले?
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नागपूरः शिंदे गटाला (Eknath Shinde) आता यापुढे महाराष्ट्रातून गुवाहटीला जावं लागणार नाही, असं वक्तव्य शहाजी बापू पाटील (Shahaji Bapu Patil) यांनी केलंय. कारण ग्रामपंचायत निवडणुकीत (Gram Panchayat Election) भाजप आणि शिंदे गटाच्या पॅनलला घवघवीत यश मिळालंय. पुढची 15 वर्ष तर मुंबईत आमचीच सत्ता आता गुवाहटीला जाणार नाही, असं वक्तव्य शहाजी बापू पाटील यांनी केलंय.

राज्यातील 7,751 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा निकाल काल लागला. यात भाजप-शिंदे गटाच्या ताब्यात सर्वाधिक ग्रामपंचायती गेल्याचा दावा करण्यात आलाय.

शिंदे गटाचे सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी टीव्ही 9 शी बोलताना या विजयावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, ‘काल आलेल्या ग्रामपंचायतीच्या निकालावरून शिंदे-फडणवीस सरकारच्या कामावर ग्रामीण भागातील जनतेनं शिक्कामोर्तब केलंय.

शिंदे साहेबांकडे अजूनही अनेक ग्रामपंचायती येतील, असा अंदाजही शहाजी बापू पाटील यांनी वर्तवला आहे. शिवसेना चिन्हावर ही निवडणूक लढवली गेल्याचा आरोप होतोय. मात्र चिन्ह कोणतेही असले तरी भाजप आणि शिंदे साहेबांची शिवसेना यांनाच जनतेने कौल दिल्याचं शहाजी बापू पाटील म्हणाले.

देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी एका कार्यक्रमात वादग्रस्त वक्तव्य केलं. देशाचे एक राष्ट्रपिता महात्मा गांधी हे आहेत. नव्या भारताचे राष्ट्रपिता नरेंद्र मोदी आहेत. यावरून अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. शहाजी बापू पाटील म्हणाले, हे मत पूर्णपणे अमृता फडणवीस यांचं आहे. मी महात्मा गांधी यांनाच राष्ट्रपिता मानतो. तर एक महान नेता म्हणून नरेंद्र मोदी यांचा आदर करतो, असं वक्तव्य शहाजी बापू पाटील यांनी केलंय.

अजित पवार काय म्हणाले?

ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये सर्वाधिक जागा मिळाल्याचा भाजपचा दावा धादांत खोटा असल्याचा आरोप विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी केलाय. ते म्हणाले, ‘ राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना या पदाला 3,258 जागा मिळाल्या आहेत. भाजप आणि शिंदेंना 3013 मिळाल्या आहेत. इतर1361 मध्ये 761 हे आमच्या मित्रपक्षांशी संबंधित निघाले. अशा एकूण 4019 जागा महाविकास आघाडी अन् मित्रपक्षाला मिळाल्या आहेत, असं वक्तव्य अजित पवार यांनी केलंय.