मुंबई : अवैध वाळू उपसा विरोधात विधानभवनाच्या पायऱ्यांवर 5 तासांपासून अधिक काळ आमदारांनी आंदोलन केलं. सकाळी 11 वाजेपासून आमदारांचं हे आंदोलन सुरु होतं. आमदार लक्ष्मण पवार आणि आमदार राजेश पवार आंदोलनासाठी विधान भवनाच्या पायऱ्यांवर बसले होते. अखेर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आमदारांची भेट घेऊन विषय जाणून घेतला आणि त्यांचं महसूलमंत्र्यांशी बोलणं करुन दिलं.(MLA’s agitation on the steps of Vidhan Bhavan against illegal sand extraction)
राज्यातील वाळू माफियांना राजकीय वरदहस्त असल्याचा गंभीर आरोप आमदार लक्ष्मण पवार आणि आमदार राजेश पवार यांनी केला आहे. बाळासाहेब थोरात महसूलमंत्री असताना हा विषय मोठा झाला आहे. सरकार बदललं तसं यांचं धोरणही बदललं असल्याचं आमदारांनी म्हटलंय. मध्यम वर्गालाही वाळूच्या लिलावात सहभागी होता यावं. गरिबांच्या घरांसाठी 6 ब्रास वाळू मोफत मिळाली पाहिजे, अशा मागण्या या आमदारांनी केल्या आहेत. सकाळी 11 वाजेपासून या आमदारांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर ठिय्या मांडला होता. देवेंद्र फडणवीस हे देखील दुपारी आमदारांची भेट घेतली आणि विषय जाणून घेतला.
फडणवीसांनी आमदार लक्ष्मण पवार आणि राजेश पवार यांचं महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याशी फोनवर बोलणं करुन दिलं. अवैध वाळू उपसा प्रश्नावर बैठक लावण्याचं आश्वासन महसूलमंत्र्यांनी दिलं आहे. त्यानंतर या आमदारांनी आपलं आंदोलन संपवलं.
वाढीव वीजबिल आणि शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडण्यात येत असल्याच्या निषेधार्थ भाजपने विधान भवनाच्या पायरीवर जोरदार आंदोलन केलं आहे. भाजप आमदार राम सातपुते तर थेट विधानभवनात कृषी पंप घेऊन आले आणि त्यांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. ही घोषणाबाजी सुरू असतानाच त्यांनी वाढीव वीजबिल फाडून सरकारचा निषेध नोंदवला. सरकारने वीज कनेक्शन तोडणी न थांबविल्यास कृषीपंपच सरकारच्या डोक्यात हाणू, असा इशाराच त्यांनी दिला.
भाजपचे माळशिरसचे आमदार राम सातपुते यांनी आज अनोखे आंदोलन केलं. सातपुते यांनी अंगात निषेधाचा फलक असलेलं बॅनर घातलं. त्यानंतर मोटरसह कृषीपंप हातात घेऊन ते विधान भवन परिसरात आले. यावेळी त्यांनी शेतकऱ्याच्या वीज बिलाला माफी मिळालीच पाहिजे, वीज कापणी रद्द करा अशी मागणी सातपुते यांनी केली. यावेळी सातपुते यांनी वीजबिल फाडून सरकारचा निषेधही नोंदवला. सातपुते यांच्यासह भाजपच्या सर्वच आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यावर येऊन जोरदार घोषणाबाजी देण्यास सुरुवात केली.
संबंधित बातम्या :
सरकारने राज्यपालांना पाठवलेलं भाषण चौकातल्या भाषणासारखं; फडणवीसांचा हल्लाबोल
MLA’s agitation on the steps of Vidhan Bhavan against illegal sand extraction