जळगाव : आमदार बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातील वादामुळे गुवाहाटी पुन्हा चर्चेत आले आहे. बच्चू कडू खोके घेऊन गुवाहाटीला गेले असा आरोप रवी राणा यांनी केला. या आरोपांमुळे बच्चू कडू चांगलेच भडकले आणि त्यांनी थेट रवी राणांकडे पुरावे मागितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी करत दोन्ही आमदारांमधील वाद मिटवला. रवी राणांनी आरोप मागे घेत दिलगिरी व्यक्त केली. यानंतर बच्चू कडू यांनी देखील वाद मिटल्याचे जाहीर कले. या वादानंतर आता सुषमा अंधारे यांनी देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेत खळबळजनक दावा केला आहे.
बच्चू कडू हे माझ्या एका फोन कॉलवर गुवाहाटीला गेले होते. त्यांना मी स्वतः फोन केला आणि मी त्यांना सांगितलं की आम्हाला सरकार बनवायचं तुम्ही सोबत या असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रतिक्रिया देताना म्हणाले होते. हाच मुद्दा सुषमा अंधारे यांनी उचलून धरला आहे.
भाजपच्या सांगण्यावरुनच आमदार गुवाहाटीला गेले असा दावा सुषमा अंधारे यांनी केला आहे. एकीकडे एकनाथ शिंदेंच्या बंडाशी संबंध नाही असे म्हणायचे आणि दुसरीकडे मीच बच्चू कडू यांना गुवाहाटीला पाठवले म्हणायचे. हा म्हणजे आंधळी कोशिंबीरचा खेळ असल्याची टीका सुषमा अंधारे यांनी केली.
भाजपच्या सांगण्यावरून गेलेल्या आमदारांना हिंदुत्वच कळलं नाही. तर, त्यांचे हिंदुत्व देवेंद्र फडणवीस यांनी जागं केलं. बंडखोरी ही सत्यासाठी नव्हे तर सत्तेसाठी झाली असा घणाघात सुषमा अंधारे यांनी केला.
आमचा या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचे भाजप नेते म्हणत होते. मात्र, ज्यावेळेला मुख्यमंत्री शिंदे यांनी बहुमत ठराव सिद्ध केला तेव्हा ते तथाकथित महाशक्तीच्या कृपेने हे सगळं झालं असे ते म्हणाले होते.
महाशक्ती नसती तर हे घडलं नसतं. ती महाशक्ती होती म्हणून आम्ही रात्री उशिरा भेटायचो असेही ते म्हणाले. या सगळ्यांचे कलाकार देवेंद्रजी आहेत असा आरोप अंधारे यांनी केला.