मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय हालचाली वेगात सुरु आहेत. शिवसेना सोडून गेलेल्या आणखी एका माजी आमदाराची घरवापसी होणार आहे. शिवसेनेचे माजी आमदार सुरेश साळोखे यांची घरवापसी निश्चित झाली आहे. ते उद्या म्हणजे बुधवारी दुपारी एक वाजता ‘मातोश्री’वर शिवसेनेत प्रवेश करतील.
नारायण राणे यांच्याबरोबर शिवसेनेतून बंडखोरी करून 10 आमदारांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला होता. यावेळी नारायण राणे यांच्या बरोबर सर्वांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. या 10 जणांपैकी फक्त श्रीवर्धनचे माजी आमदार शाम सावंत हेच फक्त नारायण राणे यांच्या सध्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात आहेत. तर शेवटपर्यंत नारायण राणे यांना साथ देणारे मुंबईतील कट्टर समर्थक आमदार कालिदास कोळंबकर हे भाजपात प्रवेश करण्याच्या मनस्थितीत आहेत.
नारायण राणेंसोबत शिवसेना सोडलेले दहा आमदार
कालिदास कोळंबकर सध्या काँग्रेसमधून भाजपात प्रवेश करण्याच्या मनस्थितीत आहेत.
मुंबईतील गोरेगावचे आमदार नंदकुमार काळे शिवसेनेत परत आले. पण नुकतंच त्यांचं अल्पशा आजाराने निधन झालं.
राजापूरचे आमदार गणपत कदम पुन्हा घरवापसी करत शिवसेनेत दाखल झाले.
वेंगुर्लाचे आमदार शंकर कांबळी पुन्हा घरवापसी करत शिवसेनेत दाखल झाले.
संगमेश्वरचे आमदार रवींद्र माने पुन्हा घरवापसी करत शिवसेनेत दाखल झाले.
अमरावतीचे आमदार प्रकाश भातसाकळे हे भाजपात 2014 मध्ये गेले आणि भाजपचे आमदार झाले.
पुण्याचे आमदार विनायक निम्हण पुन्हा घरवापसी करत शिवसेनेत दाखल झाले.
नाशिकचे आमदार माणिकराव कोकाटे भाजपात दाखल झाले.
विदर्भाचे आमदार विजय वडेट्टीवार काँग्रेसमध्येच आहेत
फक्त श्रीवर्धनचे माजी आमदार शाम सावंत हेच नारायण राणे यांच्याबरोबर सध्या आहेत.