मुंबई : विधानपरिषदेच्या सहाव्या जागेवरुन महाविकास आघाडीतील पेच संपला आहे. काँग्रेसने सहाव्या जागेसाठी आग्रह सोडत माघार घेतल्याने आता विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे (Congress on seats of MLC Polls ). कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी स्वतः महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर याबाबत माहिती दिली. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीचे 5 उमेदवार आणि भाजपचे 4 उमेदवार बिनविरोध विधान परिषदेवर निवडून जाणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. आघाडीत शिवसेना 2, राष्ट्रवादी 2 आणि काँग्रेस एका जागेवर उमेदवारी अर्ज दाखल करेल.
बाळासाहेब थोरात म्हणाले, “विधान परिषदेच्या 9 जागांसाठी निवडणूक होत आहे. सोमवारी (11 मे) अर्जाचा शेवटचा दिवस आहे. आमची अपेक्षा महाविकास आघाडीने 6 जागा लढवावी अशी होती. मात्र, एकंदर कोरोनाचं असलेलं संकट आणि त्या पार्श्वभूमीवर सर्व आमदारांना मतदानासाठी मुंबईला आणणं हे अवघड आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील यात उमेदवार आहेत. त्यांनी स्वतः ही निवडणूक बिनविरोध करण्याची विनंती केली. त्यामुळे सर्व गोष्टींचा विचार करुन आम्ही महाविकासआघाडीने 5 जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे.”
LIVE TV: विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होणार, काँग्रेसकडून सहाव्या जागेसाठी माघार, महाविकास आघाडी 5 जागा लढवणारhttps://t.co/ImprYi4kJH pic.twitter.com/DpjvUe8M8v
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 10, 2020
संजय राऊत म्हणाले, “महाराष्ट्रात होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीत स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उमेदवार आहेत. महाराष्ट्रातील कोरोनाची स्थिती आणि मुख्यमंत्र्यांचा आदर करत काँग्रेस आपला एक उमेदवार मागे घेऊन एकाच जागेवर लढणार आहे. ही निवडणूक बिनविरोध होईल.”
महाविकासआघाडीच्या बैठकीनंतर झालेल्या निर्णयावर बोलताना शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे म्हणाले, “या निवडणुकीत स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उमेदवार आहेत. त्यामुळे आपल्या निवडणुकीसाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्रातून 288 आमदार मुंबईत येणार हे उद्धव ठाकरे यांना योग्य वाटत नव्हते. आपणच लोकांना अंतर राखायला आणि घरात थांबायला सांगत असताना हे आमदार आणि त्यांचे कार्यकर्ते मुंबईत आले तर ते चित्र वाईट दिसेल, असंही उद्धव ठाकरेंचं म्हणणं होतं. त्यामुळेच ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी मुख्यमंत्र्यांची भूमिका होती. त्याप्रमाणे आघाडीतील आमचे मित्र असलेल्या काँग्रेस पक्षाने ही मागणी मान्य केली. त्यामुळे उद्या आघाडीचे 5 उमेदवार अर्ज भरतील.”
‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर विधानपरिषद निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी उद्धव ठाकरे यांची भूमिका होती. मात्र कॉंग्रेसने परस्पर उमेदवार जाहीर केल्यानंतर सहाव्या जागेवरुन महाविकास आघाडीत धूसफूस असल्याचं समोर आलं होतं. मुख्यमंत्र्यांच्या पवित्र्यानंतर काँग्रेस नेत्यांनी महाविकासआघाडीच्या बैठकीत एक पाऊल मागे घेत सहाव्या जागेसाठीचा आग्रह सोडला आहे.
दरम्यान, याआधी महाविकास आघाडीने 6 उमेदवारांची घोषणा केली होती. त्यात काँग्रेसच्या 2 उमेदवारांचा समावेश होता. मात्र, आता काँग्रेसच्या वाट्याला एकच जागा आली आहे. त्यामुळे सहाव्या जागेसाठी माघार घेतल्यानंतर काँग्रेसकडून त्यांच्या दोन उमेदवारांपैकी कोणत्या एका उमेदवाराची निवड होते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
कोणत्या पक्षाचा उमेदवार कोण?
उद्धव ठाकरे – शिवसेना
निलम गोऱ्हे – शिवसेना
राजेश राठोड – काँग्रेस
राजकिशोर मोदी – काँग्रेस
शशिकांत शिंदे – राष्ट्रवादी
अमोल मिटकरी – राष्ट्रवादी
रणजितसिंह मोहिते पाटील – भाजप
गोपीचंद पडळकर – भाजप
प्रवीण दटके – भाजप
डॉ. अजित गोपछेडे – भाजप
कुणाचं संख्याबळ काय?
सध्या ज्या जागा रिक्त झाल्यात त्यात भाजपच्या 3, राष्ट्रवादी काँग्रेसच्या 3, काँग्रेसच्या 2 आणि शिवसेनेची 1 अशा एकूण 9 जागांचा समावेश आहे. संख्याबळाचा विचार केला तर महाविकास आघाडीच्या 5 आणि भाजपच्या 3 जागा सहज निवडून येतील. पक्षीय बलाबल लक्षात घेता भाजपकडे 105, शिवसेनेकडे 56, राष्ट्रवादी काँग्रेसकडे 54, काँग्रेसचे 44, बहुजन विकास आघाडी 3, समाजवादी पार्टी 2, एमआयएम 2, प्रहार जनशक्ती 2, मनसे 1, माकप 1, शेतकरी कामगार पक्ष 1, स्वाभिमानी पक्ष 1, राष्ट्रीय समाज पक्ष 1, जनसुराज्य पक्ष 1, क्रांतिकारी शेतकरी पक्ष 1, अपक्ष 13 आमदारांचा समावेश आहे. त्यातून निवडून येण्यासाठी एका जागेसाठी 29 मतांची गरज आहे. त्यामुळे या निवडणुकीत एका जागेसाठी चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे.
विधानपरिषदेच्या 9 जागांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर
11 मे पर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार
12 मे – उमेदवार अर्जांची छाननी
14 मेपर्यंतची अर्जमाघारीसाठी मुदत
21 मे रोजी 9 जागांसाठी मतदान
मतदानाच्या दिवशीच मतमोजणी
26 मेपर्यंत संपूर्ण प्रक्रिया पूर्ण
हेही वाचा : MLC Polls | राष्ट्रवादीच्या पुढे काँग्रेसचं पाऊल, दुसरा उमेदवारही जाहीर, विधानपरिषदेचं गणित बदलणार
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्य विधिमंडळातील कोणत्याही सभासदाचे सदस्य नसल्यामुळे त्यांना 27 मे 2020 पूर्वी कोणत्याही एका सभागृहावर नियुक्त होणे आवश्यक आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीकडून प्रयत्न सुरु होते. उद्धव ठाकरे यांचं नाव राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणूनही पाठवण्यात आलं आहे. मात्र राज्यपालांनी त्याबाबत अद्याप निर्णय न घेता, त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र पाठवलं होतं.
संबंधित बातम्या :
खडसे, बावनकुळे आणि पंकजा मुंडे स्वतःच स्वतःला समजावून सांगतील : चंद्रकांत पाटील
MLC Polls : ‘मोदी गो बॅक’ म्हणणाऱ्यांना उमेदवारी, एकनाथ खडसे खवळले
MLC Polls | मुंडे, खडसे, तावडे, बावनकुळेंच्या नावावर फुली, भाजपचे चार उमेदवार जाहीर
MLC Polls | काँग्रेस सहाव्या जागेसाठी आग्रही, मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला लागणार?
संबंधित व्हिडीओ :