आश्चर्य! सत्यजित तांबेचा शपथविधी, घोषणा झाली.. एकच वादा… अजित दादा!

| Updated on: Feb 08, 2023 | 3:34 PM

नाशिक पदवीधर निवडणुकीचा अर्ज भरण्यापासून ते विजयी सत्यजित तांबे यांच्या शपथविधीपर्यंत नाट्यमय घडामोडी घडत आहेत.

आश्चर्य! सत्यजित तांबेचा शपथविधी, घोषणा झाली.. एकच वादा... अजित दादा!
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबईः नाशिक (Nashik) पदवीधर मतदार संघाचे विजयी आमदार सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांच्या शपथविधीच्या वेळी आज आश्चर्यकारक घटना घडली. विधान परिषदेत सत्यजित तांबे यांचा शपथविधी सुरु होता. त्याच वेळी सभागृहातून एकच वादा… अजित दादा (Ajit Pawar).. अशी घोषणाबाजी सुरु झाली. या घोषणेमुळे सभागृहातील सदस्यांच्या भुवया उंचावल्या. सत्यजित तांबे आणि भाजपची जवळीक वाढल्याची एकिकडे चर्चा असतानाच तांबे यांच्या विजयाला राष्ट्रवादी काँग्रेसनेही जोर लावल्याचं म्हटलं गेलं. त्यातच आता सत्यजित यांच्या शपथविधीच्या वेळी अजित पवार यांच्या नावाच्या घोषणाबाजूने नव्या चर्चांना उधाण आलंय.

काय घडलं सभागृहात?

विधान परिषदेत आज सत्यजित तांबे हे शपथविधीसाठी पुढे आले. त्यावेळी त्यांच्या समर्थकांनी एकच वादा सत्यजित दादा.. अशी घोषणाबाजी केली. यानंतर सभागृहातील इतर कार्यकर्त्यांनी एकच वादा… अजित दादा अशी घोषणाबाजी केली. या दोन्ही घोषणांनी सभागृह दुमदुमून गेले.

सत्यजित यांच्या विजयामागे राष्ट्रवादी काँग्रेस?

नाशिक पदवीधर मतदार संघ निवडणुकीत काँग्रेसचे सत्यजित तांबे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला. तर काँग्रेसने तिकिट दिलेले त्यांचे वडील डॉ. सुधीर तांबे यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय़ घेतला.

सत्यजित तांबे यांनी काँग्रेस विरोधात उचललेल्या पावलामागे नेमकं कोण आहे, याचे आडाखे बांधले जात आहेत. सुरुवातीला यामागे भाजप, देवेंद्र फडणवीस असल्याचं म्हटलं जात होतं. नाशिक पदवीधर मतदार संघ निवडणुकीत त्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला.

सत्यजित तांबे आता भाजपात प्रवेश करतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र भाजपने त्यांना तशी ऑफर दिली नाही किंवा सत्यजित तांबेही भाजपकडे मदतीसाठी गेले नाहीत. निवडणूक निकालात विजयी झाल्यानंतर सत्यजित तांबे यांनी नाना पटोले आणि काँग्रेसच्या नेत्यांवर गंभीर आरोप केले.

त्यानंतर सत्यजित तांबे यांचे मामा, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनीही नाना पटोलेंविरोधात भूमिका घेतली. नाशिकच्या निवडणुकीत काँग्रेसने मोठं राजकारण केल्याचा आरोप त्यांनी केला.

तर अजित पवार यांनीही मोठं वक्तव्य केलं. सत्यजित तांबे यांना काँग्रेसने उमेदवारी द्यायला हवी होती. पण तसं घडलं नाही, अशी खंत अजित पवार यांनी व्यक्त केली. सत्यजित तांबे हे महाविकास आघाडीचा उमेदवार नसताना त्यांच्या विजयासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने प्रयत्न केल्याचं म्हटलं जातंय. त्यानंतर आता तांबे यांच्या शपथविधीच्या वेळी अजित पवार यांच्या नावाची घोषणाबाजी झाली. यावरून आता ही राष्ट्रवादीची खेळी होती का, अशी चर्चा नव्याने सुरु झाली आहे.