सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर : दसरा मेळाव्याच्या दिवशी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) या दोन नेत्यांची भाषणं झाली. कुणाचं भाषण सर्वाधिक पाहिलं, ऐकलं जाणार यावर बरीच चर्चा झाली. शिवाजी पार्कच्या शेजारी राहणाऱ्या राज ठाकरे आणि कुटुंबियांनी कुणाचं भाषण पाहिलं असेल असा प्रश्न अनेकांना पडला होता. त्यावर राज यांचे पुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी स्पष्टपणे उत्तर दिलंय.
मी कोणताहीच दसरा मेळावा पहिला नाही, असं अमित ठाकरे यांनी म्हटलंय.
आजपासून महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या नव्या उपक्रमाला सुरूवात झाली आहे. या अंतर्गत अध्यक्ष अमित ठाकरे मराठवाडा महासंपर्क अभियान राबवत आहेत. त्यांची आता सुरुवात झाली आहे. आज ते सोलापुरात होते. तेव्हा त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
मराठवाडा दौऱ्यापूर्वी अमित ठाकरे यांचे सोलापुरात कार्यकर्त्यांनी त्यांचं जंगी स्वागत केलं. सोलापुरातील सोन्या मारुती मंदिरात मारुतीची आरती करून अमित ठाकरे तुळजापूरला रवाना झालेत.
मराठवाडा संपर्क अभियानाबाबत अमित ठाकरे यांनी माहिती दिली. मनसे विद्यार्थी सेनेच्या पुनर्बांधणीसाठी हा दौरा आहे. गणेशोत्सव नवरात्रीमुळे तो थांबलेला होता मात्र आता तो पुन्हा सुरू केलाय. ज्यांना विद्यार्थी सेनेत काम करायचं आहे. अशा नवीन विद्यार्थ्यांना तरुण-तरुणींना मी भेटणार आहे. विद्यार्थी सेनेचा आढावा घेणार आहे. त्यानंतर मनसेतील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना भेटून त्यांचा अहवाल घेऊन राजसाहेबांपर्यंत पोहोचवणार आहे, असं अमित ठाकरे म्हणालेत. शिवाय त्यांनी दसरा मेळाव्यावरही भाष्य केलंय.