मुंबई : 2017 मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तिकीटावर मुंबई महापालिकेची निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराला चोरी प्रकरणात अटक (MNS BMC Candidate Arrest) करण्यात आली आहे. 47 वर्षीय निलेश शांताराम मुद्राळे याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे चोरीचं हे प्रकरण तब्बल 24 वर्ष जुनं आहे.
मुंबईतील ओशिवारा पोलिसांनी मुद्राळेला मंगळवारी दिंडोशीतून अटक केली. अर्धवट शालेय शिक्षण झालेल्या निलेश मुद्राळेने 1995 मध्ये चोरी (MNS BMC Candidate Arrest) केली होती. त्यानंतर त्याला अटकही झाली, मात्र कोर्टात एकदा हजेरी लावल्यानंतर तो परागंदा झाला होता.
कित्येक वर्ष मुद्राळेचा ठावठिकाणा पोलिसांना लागत नव्हता. जुना पत्ता बदलल्यामुळे पोलिसांना त्याचा शोध घेणं कठीण जात होतं. मात्र मुद्राळेची राजकीय महत्त्वाकांक्षा त्याला नडली.
2017 मध्ये मुंबई महापालिकेच्या रिंगणात उतरलेल्या 2 हजार 275 उमेदवारांची यादी धुंडाळली आणि मुद्राळेचा माग काढता आला. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ वृत्तपत्राने यासंदर्भात बातमी दिली आहे.
मुद्राळेची राजकीय महत्त्वाकांक्षा त्याला काही केल्या स्वस्थ बसू देत नव्हती. 2012 आणि 2017 अशा दोन वेळा निलेश मुद्राळेने मनसेकडून मुंबई महापालिकेची निवडणूक लढवली. वॉर्ड नंबर 45 (बांगुरनगर-सुंदरनगर) मधून तो निवडणुकीच्या रिंगणात उतरला होता. याविषयी समजताच पोलिसांनी निलेश मुद्राळेचं प्रतिज्ञापत्र वाचलं आणि त्याचा पत्ता शोधून काढला.
विशेष म्हणजे 2008 मध्ये दंगल आणि हल्ला केल्याच्या आरोपातून मुद्राळेला दिंडोशी पोलिसांनी अटक केली होती. तर समतानगर पोलिसांनीही अशाच एका प्रकरणात त्याला 2010 मध्ये बेड्या ठोकल्या होत्या. आता पुन्हा एकदा अटक झाल्यानंतर मुद्राळेला अंधेरी कोर्टात हजर करण्यात आलं आहे.
मनसे कार्यकर्तीवर बलात्कार, मनसैनिक अटकेत
मनसेच्या महिला कार्यकर्तीवर बलात्कार केल्याच्या आरोपातून दोनच दिवसांपूर्वी मनसेच्याच एका कार्यकर्त्याला बेड्या ठोकण्यात आल्या होत्या. मुंबईतील चेंबुर परिसरात राहणाऱ्या सतीश वैद्यला टिळकनगर पोलिसांनी अटक केली होती. पक्षातील महिला सहकाऱ्याला धमकावणे, हल्ला करणे आणि बलात्कार या आरोपाखाली त्याला अटक झाली होती.
आरोपी सतीश वैद्य आणि पीडिता हे एकाच वर्गात शिकत होते. त्यानंतर दोघंही जण मनसेमध्ये कार्यकर्ते म्हणून सहभागी झाले. दोन वर्षांपूर्वी आरोपी आपल्याला जेवणासाठी ठाण्याला घेऊन गेला. त्यानंतर त्याने आपल्यावर बलात्कार केला, असा दावा पीडितेने तक्रारीत केला होता.
आपल्या मागण्या मान्य केल्या नाहीस, तर या भेटीगाठींबद्दल तुझ्या नवऱ्याला सांगेन, अशी धमकी देत त्याने मला ब्लॅकमेल केलं, असंही पीडितेने तक्रारीत म्हटलं होतं.