मुंबई : लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधात जोरदार प्रचार केल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आता राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. पुढच्या आठवड्यात दौऱ्याला सुरुवात होणार असून यामध्ये मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला जाईल. यासोबतच राज्यभरात पक्षाचं जाळ नव्याने बांधण्यात येणार आहे. त्यामुळे मनसेने आता विधानसभेची तयारी सुरु केल्याचं दिसतंय.
लोकसभा न लढवता विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचं राज ठाकरे यांनी जाहीर केलं होतं. यानंतर त्यांनी भाजपविरोधात दहा सभा घेतल्या. कोणत्याही उमेदवारासाठी त्यांनी सभा न घेता फक्त आणि फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांचा खरपूस समाचार घेतला. यामध्ये त्यांनी मोदींची जुनी भाषणं दाखवत भाजपला मत न देण्याचं आवाहन केलं.
थेट विधानसभेच्या तयारीला लागल्यामुळे राज ठाकरेंनी आता पक्षाचीही स्थानिक पातळीवर बांधणी करण्याचं निश्चित केल्याचं बोललं जातंय. यापूर्वीही त्यांनी महाराष्ट्रातील विविध भागात दौरा करत लोकांशी संवाद साधला होता. आता पुन्हा एकदा राज ठाकरे महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत. ग्रामीण भागामध्ये सध्या पिण्यासाठी पाणी नाही, लोकांना चारा छावण्यांवर राहून जनावरांची काळजी घ्यावी लागत आहे. या सर्व परिस्थितीचा आढावा घेऊन राज ठाकरे संवाद साधतील.
व्हिडीओ पाहा