नवी दिल्ली : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. या भेटीबाबत कोणतीही माहिती अगोदर देण्यात आली नव्हती. राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या अगोदर राज ठाकरे आणि सोनिया गांधी यांच्या भेटीमुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. ईव्हीएम प्रश्नावर निवडणूक आयुक्तांना भेटण्यासाठी राज ठाकरे सध्या दिल्लीत आहेत. 14 वर्षात पहिल्यांदाच राज ठाकरेंचा दिल्ली दौरा आहे. यानिमित्ताने त्यांनी राजकीय नेत्यांचीही भेट घेतल्याचं दिसून येतंय.
काँग्रेस सध्या पक्षासाठी नवा अध्यक्ष शोधत आहे. यूपीएच्या अध्यक्षा असलेल्या सोनिया गांधींसोबतच भेट घेतल्यामुळे याकडे आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने पाहिलं जातंय. कारण, लोकसभेला राज ठाकरेंना सोबत घेण्यास काँग्रेसच्या राज्यातील काही नेत्यांचा विरोध होता. पण नंतर काँग्रेसच्या नेत्यांनीच मनसेला सोबत घ्यायला हवं, असं मत व्यक्त केलं होतं. विधानसभेसाठी राज्यात नवं समीकरण जुळण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. ही सदिच्छा भेट होती की यामध्ये काही राजकीय चर्चा झाली याबाबत अजून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
ईव्हीएम प्रश्नावर निवडणूक आयुक्तांची भेट
राज ठाकरे यांनी निवडणूक आयुक्तांचीही भेट घेतली. यानंतर ते म्हणाले, “2014 नंतर ज्या निवडणुका झाल्या, त्यात जे काय झालं, त्याबाबत शंका आहे. त्यामुळे यापुढील निवडणुका आता बॅलेट पेपरवर घ्याव्या, अशी मागणी आम्ही निवडणूक आयुक्तांकडे केली. ईव्हीएमबाबत देशभरात संशय आहे. मी केलेलं मतदान माझ्या उमेदवाराला पोहोचलंय की नाही याबद्दल शंका असेल, तर मग मशीन हव्यातच कशाला? ही गोष्ट मी त्यांच्यासमोर ठेवली. महाराष्ट्रातील आगामी निवडणुका शिक्क्याने व्हाव्या अशी मागणी केली. मला वाटत नाही त्यांच्याकडून प्रतिसाद मिळेल. पण उद्या असं नको व्हायला की आम्ही त्यांना कळवलंच नाही. एक फॉरमॅलिटी म्हणून भेट घेऊन पत्र दिलं. बाकी पुढे काय करायचं हे आम्ही बघू”
विरोधकांना ईव्हीएम प्रश्नावर एकत्र आणण्याचे प्रयत्न
राज्यात पुढील तीन महिन्यात विधानसभा निवडणूक होत आहे. ईव्हीएमवर या निवडणूक झाल्यास राज ठाकरे, निषेध म्हणून निवडणुकीवरच बहिष्कार टाकण्याच्या मनःस्थितीत असल्याचं बोललं जातंय. राज ठाकरे हे EVM विरोधात राष्ट्रीय पातळीवर आंदोलन उभं करण्याची चाचपणी करत आहेत. त्यासाठी ते भाजप आणि EVM ला विरोध करणाऱ्या सर्व राजकीय पक्षांना एकत्र येण्याचं आवाहन करत आहेत. EVM विरोधी आंदोलनात सहभाग देण्यापर्यंत ठीक आहे, पण निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचं आवाहन जर राज ठाकरे यांनी सर्व विरोधी पक्षांना केलं तर त्या भूमिकेला त्या त्या राजकीय पक्षांचा पाठिंबा मिळेल का? असाही प्रश्न निर्माण होतो.