मुंबई: सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. प्रत्येक पक्ष आपली रणनिती ठरवत असून त्यासाठी भेटी-गाठीही होत आहेत. त्यातच आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज दुपारी दिल्लीला रवाना झाले आहेत. त्यांच्यासोबत पक्षाचे नेते अविनाश अभ्यंकर आणि अनिल शिदोरे देखील आहेत. राज ठाकरेंच्या या दिल्ली वारीने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
राज ठाकरे आणि त्यांच्यासोबतचे नेते सोमवारी (8 जुलै) दुपारी 12 वाजता केंद्रीय निवडणूक आयुक्तांची भेट घेणार आहेत. यावेळी ते निवडणूक आयुक्तांसमोर आपली ईव्हीएमबाबतची भूमिका मांडण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. राज ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपविरोधात चांगलेच रान उठवले होते. राज्यात अनेक ठिकाणी त्यांनी सभाही घेतल्या आणि भाजपच्या धोरणांची चिरफाड केली. मात्र, लोकसभा निवडणुकांचा निकाल पाहून त्यांनी एकाच शब्दात प्रतिक्रिया व्यक्त केली, तो शब्द होता ‘अनाकलनीय’. या निकालानंतर राज ठाकरेंनी ईव्हीएमवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. तसेच निवडणूक आयोगाच्या भूमिकांवरही नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे आता राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आपली भूमिका थेट मुख्य निवडणूक आयुक्तांकडे मांडणार असल्याचे दिसत आहे.
दरम्यान, माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनीही दुसऱ्यांदा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ‘कृष्णकुंज’वर जाऊन भेट घेतली होती. या दोघांमध्ये सुमारे तासभर चर्चा झाली. राजू शेट्टी यांनी याआधी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यानंतर काही दिवसातच त्यांनी पुन्हा राज ठाकरेंच्या भेट घेतली. त्यामुळे अनेक शक्यता वर्तवल्या जात आहेत. आगामी काळात महाराष्ट्रात नवी समीकरणं दिसण्याचीही शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.