राज ठाकरे-सोनिया गांधी भेट : पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती?

| Updated on: Jul 08, 2019 | 9:06 PM

ईव्हीएम प्रश्नावर निवडणूक आयुक्तांना भेटण्यासाठी राज ठाकरे सध्या दिल्लीत आहेत. 14 वर्षात पहिल्यांदाच राज ठाकरेंचा दिल्ली दौरा आहे. यानिमित्ताने राज ठाकरेंनी महाराष्ट्रातील राजकारणाचा पुन्हा एकदा नवा अध्याय लिहिण्यास सुरुवात केली आहे का, असा प्रश्न निर्माण होतो.

राज ठाकरे-सोनिया गांधी भेट : पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती?
Follow us on

नवी दिल्ली : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. या भेटीबाबत कोणतीही माहिती अगोदर देण्यात आली नव्हती. राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या अगोदर राज ठाकरे आणि सोनिया गांधी यांच्या भेटीमुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. ईव्हीएम प्रश्नावर निवडणूक आयुक्तांना भेटण्यासाठी राज ठाकरे सध्या दिल्लीत आहेत. 14 वर्षात पहिल्यांदाच राज ठाकरेंचा दिल्ली दौरा आहे. यानिमित्ताने राज ठाकरेंनी महाराष्ट्रातील राजकारणाचा पुन्हा एकदा नवा अध्याय लिहिण्यास सुरुवात केली आहे का, असा प्रश्न निर्माण होतो.

काँग्रेस सध्या पक्षासाठी नवा अध्यक्ष शोधत आहे. यूपीएच्या अध्यक्षा असलेल्या सोनिया गांधींसोबतच भेट घेतल्यामुळे याकडे आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने पाहिलं जातंय. कारण, लोकसभेला राज ठाकरेंना सोबत घेण्यास काँग्रेसच्या राज्यातील काही नेत्यांचा विरोध होता. पण नंतर काँग्रेसच्या नेत्यांनीच मनसेला सोबत घ्यायला हवं, असं मत व्यक्त केलं होतं. विधानसभेसाठी राज्यात नवं समीकरण जुळण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. ही सदिच्छा भेट होती की यामध्ये काही राजकीय चर्चा झाली याबाबत अजून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

इतिहासाची पुनरावृत्ती?

राज ठाकरे यांनी याअगोदर काँग्रेसवरही सडकून टीका केली आहे. लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजपविरोधात प्रचार करताना काँग्रेसवर टीका केल्याची आठवणही करुन दिली. पण राज ठाकरे पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती करणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा काँग्रेसशी असलेला वैचारिक आणि राजकीय विरोध कधीही लपून नव्हता. पण त्यांनी आणीबाणीनंतर काँग्रेसला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता.

कार्यकाळ पूर्ण करण्याच्या अगोदरच जनता पक्षाचं सरकार पडल्यानंतर निवडणुका लागल्या. त्यावेळी निवडणूक न लढता काँग्रेसला पाठिंबा देण्याचा निर्णय बाळासाहेबांनी घेतला होता. या निवडणुकीत काँग्रेसने विजय मिळवला आणि इंदिरा गांधी पुन्हा पंतप्रधान झाल्या.

काँग्रेसच्या नेत्यांना काय वाटतं?

राज ठाकरे आणि सोनिया गांधी यांची भेट ही इतिहासाचीच पुनरावृत्ती असल्याचं महाराष्ट्र युवा काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांना वाटतं. त्यांनी बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या भेटीचा फोटोही शेअर केलाय. लोकसभा निवडणुकीत मनसे आपल्यासोबत नको म्हणणाऱ्या काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी नंतर राज ठाकरे सोबत हवेत ही भूमिका घेतली होती. पण राज ठाकरेंनी कोणत्याही पक्षासाठी प्रचार न करता फक्त भाजपच्या विरोधात सडकून टीका केली.

राज ठाकरे यांनीही 2019 च्या लोकसभा निवडणुकीत हीच भूमिका निभावली. पण फरक एवढाच होता की यावेळी काँग्रेसचा पराभव झाला. राज ठाकरे यांची भाषण शैली, लोकांसमोर स्वतःला सादर करण्याचं कौशल्य, इलेक्ट्रॉनिक प्रझेंटेशन आणि सभांना जमणारी गर्दी ही त्यांची जमेची बाजू आहे. राज ठाकरेंचा फायदा होईल हे काँग्रेस किंवा राष्ट्रवादी यापैकी कुणीही नाकारत नाही. पण राज ठाकरेंनी याबाबत कधीही जाहीर भाष्य केलेलं नाही.

राज ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीत भाजपचा विरोध केलाच, पण आता विधानसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रात पुन्हा एकदा नवा अध्याय लिहिला जाऊ शकतो, असं बोललं जातंय. राज ठाकरे 14 वर्षांनी दिल्लीला गेले आहेत. शिवाय गांधी घराण्यातील एखाद्या प्रमुख व्यक्तीसोबत त्यांची ही पहिलीच भेट आहे. ईव्हीएमविरोधात ते विरोधी पक्षांना एकत्र येण्याचं आवाहन करत आहेत. महाराष्ट्र आणि देशातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता सोनिया गांधींसोबत राजकीय चर्चा झाली नसेल, असं कुणीही म्हणणार नाही. पण यापुढील घडामोडींमध्ये मनसेची काय भूमिका असेल त्यावरुन विधानसभा निवडणुकीतील राजकीय समीकरणं ठरणार आहेत. राज ठाकरे यांनी काँग्रेससोबत विधानसभा निवडणूक लढवल्यास हा राज्याच्या राजकारणात नवा अध्याय असेल.

विरोधकांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न

राज्यात पुढील तीन महिन्यात विधानसभा निवडणूक होत आहे. ईव्हीएमवर या निवडणूक झाल्यास राज ठाकरे, निषेध म्हणून निवडणुकीवरच बहिष्कार टाकण्याच्या मनःस्थितीत असल्याचं बोललं जातंय. राज ठाकरे हे EVM विरोधात राष्ट्रीय पातळीवर आंदोलन उभं करण्याची चाचपणी करत आहेत. त्यासाठी ते भाजप आणि EVM ला विरोध करणाऱ्या सर्व राजकीय पक्षांना एकत्र येण्याचं आवाहन करत आहेत. EVM विरोधी आंदोलनात सहभाग देण्यापर्यंत ठीक आहे, पण निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचं आवाहन जर राज ठाकरे यांनी सर्व विरोधी पक्षांना केलं तर त्या भूमिकेला त्या त्या राजकीय पक्षांचा पाठिंबा मिळेल का? असाही प्रश्न निर्माण होतो.