पुणे: माझ्यामागे ‘ईडी’ लावली तर मी सीडी बाहेर काढेन, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी म्हटले होते. त्यामुळे मी आता एकनाथ खडसे सीडी कधी बाहेर काढतात, याची वाट पाहत असल्याचे वक्तव्य मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केले. राज्यात केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर होत आहे. यापूर्वी काँग्रेसची सत्ता असतानाही तेच झाले होते आणि आता भाजपही तेच करत आहे. ईडीसारखी सरकारी यंत्रणा ही सरकारच्या हातातलं बाहुलं झालंय. त्यामुळे खरे गुन्हेगार मोकाट राहतात, अशी टीका राज ठाकरे यांनी केली. (MNS chief Raj Thackeray on NCP leader Eknath Khadse ED probe)
राज ठाकरे हे दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर असून त्यांच्या हस्ते रविवारी मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन पार पडले. यावेळी राज ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी राज ठाकरे यांनी ‘ईडी’च्या कारवाईवर तोफ डागत अप्रत्यक्षपणे भाजपच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली. त्यामुळे आता यावर भाजपचे नेते काही प्रतिक्रिया देणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
भोसरी जमीन गैरव्यवहारप्रकरणी ईडीने नुकतीच एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना अटक केली होती. त्यानंतर ईडीकडून एकनाथ खडसे यांचीही तब्बल 9 तास कसून चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर एकनाथ खडसे यांच्या वकिलांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना खडसे ईडीला सर्वतोपरी सहकार्य करण्यास तयार असल्याचे सांगितले होते. चौकशीवेळी आम्ही सर्व प्रकारचं सहकार्य दिलंय. या चौकशीत संपत्तीची संपूर्ण चौकशी करण्यात आलीय. ईडीने स्टेटमेंट्सची सत्यता तपासलीय. याशिवाय ईडीला जे कागदपत्रे हवी होती ती सगळी दिलीत. ईडीला आणखी काही कागदपत्रे हवी होती ती कागदपत्रे 10 दिवसात जमा करण्यास सांगितलं आहे. ईडीला जेव्हा चौकशीसाठी आमची गरज लागेल तेव्हा तेव्हा आम्ही यायला तयार आहोत, असे एकनाथ खडसे यांच्या वकिलांनी म्हटले होते.
मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण जर सर्वांनाच मान्य आहे तर अडले कुठंय?, असा सवाल करतानाच आरक्षणाच्या मुद्द्यावरून तरुणांची माथे भडकावून केवळ राजकारण करायचे आहे का?, असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुण्यात आले होते. त्यांच्या हस्ते पुण्यातील शहर कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी हा सवाल केला. खूप पूर्वी मराठा मोर्चा निघाला होता. त्यावेळी काँग्रेस, शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जाऊन मोर्चेकऱ्यांची भेट घेतली होती. त्यावेळी सर्वांना आरक्षण मान्य होतं. जर सर्वांनाच आरक्षण मान्य होतं तर अडकलं कुठे? की केवळ इश्यू करायचा आहे? मराठा तरुणांची निव्वळ डोकी भडकवायची आहे का?, असा सवाल राज यांनी केला.
जे मराठा आरक्षणाच्या बाबतीत आहे. तेच ओबीसी आरक्षणाबाबत आहे. ओबीसींचं आरक्षणही सर्वांना मान्य आहे. तर अडलं कुठे? तुम्ही कोर्टात आरक्षणाची बाजू व्यवस्थित का मांडत नाहीत? एकमेकांकडे बोट का दाखवत आहात? एकदा या सर्वांना एका व्यासपीठावर आणा आणि विचारा, असं ते म्हणाले.
(MNS chief Raj Thackeray on NCP leader Eknath Khadse ED probe)