मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुधारित नागरिकत्व कायद्याबाबत आपली भूमिका स्पष्ट (Raj Thackerays U turn on CAA) केली आहे. “माझं कायद्याला समर्थन नाही. तसंच मनसेचा 9 फेब्रुवारीचा मोर्चा हा सुद्धा या कायद्याच्या समर्थनार्थ नाही तर घुसखोर पाकिस्तानी आणि बांग्लादेशींना समर्थन देणाऱ्या मोर्चाच्या विरोधात हा मोर्चा आहे”, असं राज ठाकरे (Raj Thackerays U turn on CAA) म्हणाले.
राज ठाकरे यांनी आज मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांच्या शंकेचे निरसन केलं. “मनसेचा मोर्चा हा सीएएच्या समर्थनार्थ नाही. तर घुसखोर पाकिस्तानी आणि बांग्लादेशींना समर्थन देणाऱ्या मोर्चाच्या विरोधात हा मोर्चा आहे. सीएए आणि एनआरसीबाबत चर्चा होऊ शकते, मात्र समर्थन नाही”, असं राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितलं.
राज ठाकरे यांनी ‘कृष्णकुंज’ या निवासस्थानी मनसेच्या नेते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. सीएए आणि एनआरसीला पाठिंबा देण्यावरुन मनसे पदाधिकाऱ्यांमध्ये गोंधळ आहे. त्यासंदर्भातच पदाधिकाऱ्यांच्या शंकांचं निरसन करण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली होती. पहिल्याच महाअधिवेशनात मनसेने कात टाकत हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतला. नागरिकत्व सुधारणा कायदा, राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी याच्या बाजूने राज ठाकरेंनी भूमिका घेतली आहे. मात्र मनसेच्या भूमिकेवरुन पक्षातील काही नेत्यांनीच राज ठाकरेंना प्रश्न विचारले होते.
मनसेची नेमकी भूमिका काय? मनसे सीएए आणि एनआरसीला पाठिंबा देऊन भाजपसोबत जाणार का? विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत घेतलेल्या भाजपविरोधी भूमिकेवरुन यूटर्न घ्यायचा का? असे काही प्रश्न मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केल्याचं म्हटलं जातं.
मुंबईतील वांद्रे परिसरात असलेल्या रंगशारदा सभागृहात काल (सोमवार 27 जानेवारी) मनसेची बैठक आयोजित करण्यात आली होती. केवळ दहा मिनिटात चर्चा आटोपून राज ठाकरे बैठकस्थळाहून निघाले. मनसे नेत्यांना पुढील सूचना देण्यास राज ठाकरेंनी सांगितलं. ‘सीएए’ कायद्याच्या समर्थनार्थ मनसेने 9 फेब्रुवारीला आयोजित केलेला मोर्चा यशस्वी झाला पाहिजे, अशा सूचनाही राज यांनी दिल्या होत्या.
राज ठाकरे महाअधिवेशनातील भाषणात काय म्हणाले होते?
महाअधिवेशनातील समारोपाच्या भाषणात राज ठाकरे यांनी केंद्र सरकारच्या ‘नागरिकत्व सुधारणा कायद्या’ला जाहीर पाठिंबा दिला होता. मनसे 9 फेब्रुवारीला आझाद मैदानात ‘सीएए’च्या समर्थनार्थ भव्य मोर्चा काढणार असल्याची घोषणाही राज ठाकरे यांनी केली होती.
देशाच्या इतर भागातून लोक देशात सरळ घुसखोरी करतात. त्यामुळे आपल्याला इतर देशांप्रमाणे कठोर व्हायला हवं. म्हणून पहिल्यांदा या देशात आलेले बांग्लादेशी आणि पाकिस्तानी मुस्लिम बाहेर काढले पाहिजेत. यासाठी माझा केंद्राला पूर्ण पाठिंबा आहे, असं राज ठाकरे म्हणाले होते.
‘अचानक देशात मोर्चे निघायला लागले, मुस्लिम रस्त्यावर उतरले. मला काहींनी सांगितलं की त्यांना काश्मिर, राम मंदिराचा राग आहे. त्याचा एकत्रित राग आता बाहेर पडत आहे. ते जर बाहेरच्या मुस्लिमांसोबत उभे राहत असतील, तर आम्ही त्यांना का साथ द्यावी? अनेक जण म्हणतात, राज ठाकरेचा रंग बदलला का? मात्र माझा रंग तोच आहे. मी रंग बदलून सरकारमध्ये जात नसतो. राज ठाकरे विरोधाला विरोध करत नाही.’ असं राज ठाकरे भाषणात म्हणाले होते.