मुंबई : झेंड्यावर राजमुद्रेचा वापर केल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला राज्य निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे. संभाजी ब्रिगेड आणि मराठा महासंघाच्या तक्रारीनंतर निवडणूक आयोगाने कारवाईचा बडगा उगारला (MNS Flag Election Commission Notice) आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला राज्य निवडणूक आयोगाचं पत्र मिळालं आहे. मनसेच्या भगव्या रंगाच्या नव्या ध्वजावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेचा वापर केल्यामुळे तक्रारी दाखल झाल्या होत्या. मनसेने तक्रारीवर योग्य ते उत्तर देण्यास आयोगाने सांगितलं आहे.
Maharashtra Navnirman Sena has received a letter from State Election Commission on a complaint filed against MNS’s new flag which bears Chhatrapati Shivaji’s insignia. Commission asks MNS to take appropriate action on the complaint
— ANI (@ANI) February 13, 2020
23 जानेवारीला आयोजित मनसेच्या महाअधिवेशनात पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नव्या झेंड्याचं अनावरण केलं होतं. मनसेचा नवा ध्वज भगव्या रंगाचा असून त्यावर मध्यभागी राजमुद्रा आहे. महाअधिवेशनाच्या सुरुवातीलाच मनसेच्या नव्या झेंड्याचं अनावरण करुन राज ठाकरेंनी पक्ष कात टाकत असल्याचे संकेत दिले.
‘आपले दोन झेंडे आहेत. एक राजमुद्रा असलेला आणि तसाच दुसरा निशाणीचा झेंडा आहे. निवडणुकीच्या वेळी राजमुद्रा असलेला झेंडा वापरायचा नाही. राजमुद्रेचा मान राखला गेलाच पाहिजे. कुठेही गोंधळ होता कामा नये’ असं राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं होतं.
‘माझ्या डोक्यातून हा झेंडा जात नव्हता. सहा वर्षांपूर्वी शिवजंयतीला हा झेंडा बाहेर काढण्याचा विचार केला. आपण बदलले पाहिजे हे गेल्या काही दिवसांपासून मनात सुरु होते. आमचा डीएनए हाच झेंडा आहे’, अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली होती.
हेही वाचा : मी पक्षाचा झेंडा बदलला नाही, उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला
ही महाराजांची राजमुद्रा आहे. राजमुद्रा आपली प्रेरणा आहे. हा इतर कुठला झेंडा नाही. तो ज्यावेळी हातात घ्याल तेव्हा कुठेही वेडा वाकडा पडलेला दिसता कामा नये, असंही राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना ठणकावून सांगितलं होतं.
दरम्यान, ‘राजमुद्रा’ हे छत्रपती शिवरायांचे राष्ट्रीय प्रतीक आहे. भगवा झेंडा वापरा, पण राष्ट्रीय प्रतीक मतांची भीक मागण्यासाठी वापरायचे नाही, अशी प्रतिक्रिया संभाजी ब्रिगेडचे नेते संतोष शिंदे यांनी मनसेने झेंडा लाँच करण्यापूर्वी दिली होती. त्यामुळे मनसेचा नवा झेंडा आधीपासूनच वादात अडकला (MNS Flag Election Commission Notice) होता.