मुंबईः मुंबईच्या माजी महापौर (Mayor) किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांची SRA घोटाळ्याप्रकरणी चौकशी करण्यात येत आहे. यावरून मनसे नेते गजानन काळे (Gajanan Kale) यांनी किशोरी पेडणेकरांवर अत्यंत खोचक टीका केली आहे. मोरूच्या मावशीने मोठाच डल्ला मारला म्हणायचं… अशा शब्दात किशोरी पेडणेकरांची थट्टा केली आहे. एसआरए योजनेत स्वतःला घर आणि गाळे मिळवण्यासाठी ही मांजर (Cat) लपून दूध पित होती तर… असा आरोप मनसेने केला आहे.
किशोरी पेडणेकर यांना दादर पोलीस स्टेशनमधून चौकशीकरिता बोलावण्यात आलं आहे. एसआरएमध्ये घर देण्याच्या नावाखाली काहींची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
पालिका अधिकाऱ्यांच्या संगनमताने ही फसवणूक झाली. यात चार जणांना अटकही करण्यात आली आहे. किशोरी पेडणेकर यांच्या जवळच्या व्यक्तीसह पालिका कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याचा आरोप करण्यात आलाय.
याच संदर्भाने किरीट सोमय्या यांनीही आणखी आरोप केले आहेत. वरळीतील 6 SRA फ्लॅटचा बेकायदेशीर ताबा घेतल्याचा आरोप सोमय्यांनी केलाय. या प्रकरणी त्यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.
यावरून मनसे नेते गजानन काळे यांनी ट्विट केलंय. त्यांनी लिहिलंय… ‘ मोरूच्या मावशीने मोठाच डल्ला मारला म्हणायचं. गोरगरीब झोपडपट्टीवासीयांसाठी असलेल्या SRA योजनेत स्वतःला घर व ६ गाळे .. मांजर लपून दूध पीत होती तर. या तर मुंबई पोखरणारी घुस निघाली असं म्हणायचं का आता?
या प्रकरणाची चौकशी झालीच पाहिजे. महाराष्ट्राच्या राजकारणातील कॉमेडी क्वीन ‘भारती सिंग’… #किशोरीभव असं ट्विट गजाजन काळे यांनी केलंय.
मोरूच्या मावशीने मोठाच डल्ला मारला म्हणायचं.
गोरगरीब झोपडपट्टीवासीयांसाठी असलेल्या SRA योजनेत स्वतःला घर व ६ गाळे ..
मांजर लपून दूध पीत होती तर.या तर मुंबई पोखरणारी घुस निघाली असं म्हणायचं का आता
चौकशी झालीच पाहिजे.
महाराष्ट्राच्या राजकारणातील कॉमेडी क्वीन ‘भारती सिंग’#किशोरीभव— Gajanan Kale (@GajananKaleMNS) October 29, 2022
दरम्यान, किशोरी पेडणकेरांवर ज्या गाळ्यांसदर्भाने आरोप झाले, त्या ठिकाणी म्हणजे गोमाता नगरमध्ये आज शनिवारी सकाळीच किशोरी पेडणेकर पोहोचल्या. त्यांच्या हातात मोठं कुलूप होतं. त्यांनी तेथील गाळेधारकांना तुम्ही कुणाकडून गाळे खरेदी केले, असा प्रश्न विचारला. यावेळी माध्यमप्रतिनिधींचे कॅमेरेही सोबत होते.