नाशिक : नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत. विद्यमान आमदाराला डावलून मनसेतून आलेल्या नेत्याला भाजपने उमेदवारी (Nashik East BJP Candidate) दिल्याचा प्रकार नाशिकमध्ये घडला आहे. नाशिक पूर्व मतदारसंघातील भाजप आमदार बाळासाहेब सानप यांना डावलून मनसेतून भाजपमध्ये उडी मारणाऱ्या राहुल ढिकले यांना ऐनवेळी उमेदवारी देण्यात आली आहे.
राहुल ढिकले हे मनसेचे माजी आमदार उत्तमराव ढिकले यांचे चिरंजीव आहेत. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर राहुल ढिकले यांच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमा झाली आहे. ढिकलेंना उमेदवारी (Nashik East BJP Candidate) मिळाल्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे.
दुसरीकडे, सानप यांचं तिकीट कापल्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे. खुद्द बाळासाहेब सानप यांचाही हिरमोड झालेला आहे. भाजपचे अनेक नगरसेवक राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे.
बाळासाहेब सानप हे भाजपचे नाशिक महापालिकेतील पहिले महापौर ठरले होते. गेल्या वेळी नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यावर सानप यांना विजय मिळाला होता.
विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी आपण अपक्ष नगरसेवक पवन पवारची भेट घेतली व मदत करण्याची गळ घातली. पवन पवारने आपल्याला निवडणुकीत मदत केली असून, माझ्या विजयात त्याचा मोठा वाटा असल्याची मुक्ताफळं बाळासाहेब सानप यांनी त्यावेळी उधळली होती.
गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या पवन पवारमुळेच आपण निवडून आल्याचा खुलासा सानप यांनी केल्याने त्यांच्या विजयावर प्रश्नचिन्ह उभं राहिलं होतं. या कारणानेच त्यांचं तिकीट कापलं गेल्याची चर्चा आहे.
संबंधित बातम्या
अखेर रश्मी बागल यांच्या तिकिटाचा निर्णय झाला, नारायण पाटील यांचा पत्ता कट
राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा पत्ता कट
मनसेच्या ‘डॅशिंग’ नेत्या रुपाली पाटील उमेदवारी डावलल्याने आक्रमक