नवी मुंबईः हिंदुत्वविरोधी संभाजी ब्रिगेडसोबत (Sambhaji Brigade) शिवसेनेनं (Shivsena) युती करणं हे बाळासाहेब ठाकरेंना (Balasaheb Thackeray) अपेक्षित आहे का, असा सवाल मनसे नेते गजानन काळे यांनी उद्धव ठाकरे यांना केलाय. संभाजी ब्रिगेड ही राष्ट्रवादी कांग्रेसचीच बी टीम आहे. या संघटनेने नेहमीच हिंदुत्वविरोधी भूमिका घेतली आहे. मग बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना संभाजी ब्रिगेडसोबत कशी जाऊ शकते. शिवसेनेच्या या निर्णयामुळे सामान्य शिवसैनिकांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे, असं वक्तव्य मनसे नेते गजानन काळे यांनी केलंय. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज एक पत्रकार परिषद घेत शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडची युती होत असल्याचे घोषित केले. तसेच यापुढील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही दोन्ही संघटना एकत्रित लढतील, असे सूतोवाच केले. भाजपकडे झुकलेली मराठा व्होट बँक काबीज करण्यासाठी शिवसेनेने ही खेळी केल्याचं स्पष्ट दिसून येतंय. मात्र राजकारण करण्याच्या नादात शिवसेनेच्या मूळ भूमिकेला तिलांजली दिली जातेय, असा आरोपही शिवसेनेवर होतोय.
संभाजी ब्रिगेड आणि शिवसेनेच्या युतीवर टीका करताना गजानन काळे म्हणाले, ‘ महाराष्ट्रात जातीयवादाचं विष पेरण्यासाठी राष्ट्रवादीची बी टीम म्हणून ज्यांनी काम केलंय, या संभाजी ब्रिगेडशी राष्ट्रवादीची ड टीम म्हणजे उद्धव सेना यांची युती झाल्याचं जाहीर झालं. बाबासाहेब पुरंदरे, गिरीश कुबेरांविरोधी आंदोलनं या संघटनेने केली आहेत… संभाजी ब्रिगेडने नेहमीच जातीयवादी भूमिका घेतली आहे. माझा शिवसेनेला सवाल आहे, आदरणीय बाळासाहेबांना हेच अपेक्षित आहे का… ज्या हिंदुत्वासाठी उद्धव ठाकरेंसोबत जे शिवसैनिक सोबत आहेत. काही आमदार, नगरसेवक निघूनच गेलेत, पण सामान्य शिवसैनिकही अस्वस्थ आहे.
शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज एक पत्रकार परिषद घेत संभाजी ब्रिगेडशी युती झाल्याचे घोषित केले. राज्यात तसेच देशातून प्रादेशिक पक्षांचं अस्तित्व संपवण्याचा भाजपचा डाव आहे. मात्र प्रादेशिक अस्मिता जपण्यासाठी, लोकशाही तसेच संविधान वाचवण्यासाठी आम्ही ही युती करत असल्याचं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं. आज शिवसेना पक्षावर संकट आलं असताना आमच्यासोबत येणाऱ्यांचं आम्ही स्वागत करतो. किंबहुना अशा परिस्थितीत आम्हाला साथ देणं यातच त्यांचं खरं शौर्य दिसून येतंय. हे खरे लढवैय्ये आहेत, असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं. या पत्रकार परिषदेत संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मनोज आखरे, पक्षाचे प्रवक्ते गंगाधर बनबरे तसेच शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री सुभाष देसाई हेदेखील उपस्थित होते.