मुंबई : सध्या राज्याच्या राजकारणात बरेच बदल होत आहे. शिंदेंच्या बंडामुळे शिवसेनेत मोठी पोकळी निर्माण झाली आहे. आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) अधिक आक्रमक झाल्याचं दिसतंय. ते अधिक ठामपणे शिवसेनेची बाजू मांडताना दिसत आहेत. ते सध्या दौरा करत आहेत. पक्षातील नेत्यांशी, सर्वसामान्य लोकांशी बोलून त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत. अश्यातच त्यांचे बंधू आणि मनसे नेते अमित ठाकरे यांनी त्यांच्या या दौऱ्यावर टीका केली आहे. अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी आदित्य ठाकरेंच्या रॅलीवर त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली. “शिवसेनेत बंड होण्याआधी मी माझे दौरे सुरू केलेत. पण माझा आदित्य ठाकरेंना प्रश्न आहे. जर एकनाथ शिंदे यांचं बंड झालं नसतं तर तुम्ही दौरा केला असता का, एवढाच माझा एक प्रश्न आहे”, असं अमित ठाकरे म्हणालेत.
तेजस ठाकरे ठाकरे राजकारणात सक्रीय होत आहेत, अश्या चर्चा आहेत. त्यावर अमित ठाकरेंनी भाष्य केलंय. तेजस राजकारणात येत असतील तर त्यांचं स्वागत आहे, असं अमित ठाकरे म्हणालेत.
“येणारी प्रत्येक निवडणूक आपल्यासाठी महत्वाची आहे. येत्या निवडणुकीत सक्षम उमेदवार द्यायचा आहे आणि तो निवडून आणण्यासाठी कसोशीने प्रयत्न करायचे आहेत. त्या निवडणुकांमध्ये प्रचार करण्यासाठी मी तयार आहे. कुठलीही निवडणूक लागली तरी मला बोलवा. आपण जोरदार प्रचार करू. आपल्या पक्षाने केलेलं काम आणि विचार घरोघरी पोहचवू. लोक नक्की आपल्यावर विश्वास ठेवतील आणि आपले लोक निवडूण येतील. आपल्याला प्रत्येक निवडणूक लढायची आहे आणि जिंकायचीदेखील आहे. त्यामुळे मनसैनिकांनो, कामाला लागा”, असं अमित ठाकरे म्हणाले आहेत. अमित ठाकरे आजपासून चार दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आहेत. यात ते नाशिक शहर आणि जिल्ह्याचा दौरा करणार आहेत.
सध्या राज्याच्या राजकारणात ठाकरे घराणे कोणत्या ना कोणत्या कारणामुळे केंद्रबिंदू राहिले. एकीकडे बंडखोर आमदारांवर उद्धव ठाकरे निशाणा साधत आहेत तर दुसरीकडे आदित्य ठाकरे निष्ठा यात्रेतून मतदारांशी संवाद साधत आहेत. त्याच ठाकरे घराण्यातील दुसरा चर्चेतील चेहरा म्हणजे मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरेही दौऱ्यावर आहेत. यात त्यांचं जंगी स्वागत करण्यात येतंय. युवकांबरोबर संवाद साधण्यासाठी गेले असता विद्यार्थी-विद्यार्थिनींनी आनंदाने त्यांचे ढोल ताशांच्या गजरात त्याचे स्वागत करण्यात येतंय. महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी ढोल ताशांच्या तालावर नाचत अमित ठाकरे यांचे जोरदार स्वागत करत आहेत.