शिवसेना म्हणजे शरद पवार (Sharad Pawar) यांच्या पिंजऱ्यातील मांजर आहे, अशी घणाघाती टीका मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी केली आहे. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे आज गटप्रमुखांचा मेळावा घेत आहेत. या पार्श्वभूमीवर संदीप देशपांडेंनी हे टीकास्त्र सोडलंय. कितीही मेळावे घेतले तरी तुमच्याकडे मुळात विचार आहे का ? असा सवाल देशपांडेंनी केलाय. औरंगाबादमधील शिवसेना नेत्यांवरही देशपांडेंनी जोरदार टीका केली आहे. तसंच जयंत पाटील यांनी शिवसेनेला राष्ट्रवादी संपवतेय, यावर बोलावं, असं थेट आव्हानही त्यांनी दिलंय. मनसे नेत्याची ही टीका शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिव्हारी लागण्याची शक्यता आहे.
शरद पवारांच्या प्राणी संग्रहालयातल्या पिंजऱ्यामधील मांजर अशी शिवसेनेची गत झाली आहे, असं वक्तव्य देशपांडे यांनी केलंय. काल शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी मनसेवर टीका केली. मनसे ही भाजपची दुसरी शाखा असल्याचं त्यांनी म्हटलं.
अंबादास दानवेंना उत्तर देताना संदीप देशपांडे म्हणाले, ‘ हे सगळं आऊटडेटेड नेतृत्व आहे. संभाजीनगरमधले सगळे नेते असेच आहेत, दानवे असतील नाही तर खैरे असतील…
आम्ही आमचा पक्ष वाढवतोय. पण राष्ट्रवादी शिवसेना पक्ष संपवतेय, त्याचं काय? जयंत पाटील यांनी आधी याचं उत्तर द्यावं, असं वक्तव्य संदीप देशपांडे यांनी केलंय.
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आज प्रथमच प्रत्यक्ष गटप्रमुखांच्या मेळाव्याला संबोधित करत आहेत. गोरेगाव येथील नेस्को संकुलावर हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना या मेळाव्याच्या निमित्ताने रणशिंग फुंकणार असे संकेत आहेत.
विशेष म्हणजे या निमित्ताने उद्धव ठाकरेंचे दुसरे पुत्र तेजस ठाकरे हेदेखील राजकारणात एंट्री करणार असल्याची चर्चा आहे. मुंबईत उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरेंचे बॅनर्स ठिकठिकाणी झळकत आहेत.