मुंबई : राज्यात गेले काही दिवस राजकीय सत्तानाट्य रंगल्याचे पहायला मिळाले. यावरून सुरू झालेले आरोप -प्रत्यारोपाचे राजकारण अजूनही सुरूच आहे. शिवसेनेकडून (Shiv Sena) भाजप (bjp) आणि शिंदे गटावर आरोप करण्यात येत आहेत. तर दुसरीकडे आता मनसेकडून (MNS) देखील शिवसेनेला वारंवार निशाणा बनवण्यात येत आहे. राज्यातील प्रमुख पक्षांनी मुंबई महापालिका निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. यावरून देखील आता आरोप -प्रत्यारोप होत आहेत. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी भरपावसात शिवाजी पार्कची पहाणी केली. यावेळी त्यांनी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. आदित्य ठाकरे यांनी शिवाजी पार्कची वाट लावल्याचा आरोप त्यांनी केला आहे. आदित्य ठाकरे यांनी स्वतःच्या ईगोसाठी जनतेचे 4 कोटी रुपये खर्च केले. त्यातील दोन कोटींची तर माती आणून टाकली. रेनवॉटर हार्वेस्टिंग प्रकल्पही कोलमडला असल्याचे संदीप देशपांडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले आहे.
आदित्य ठाकरे यांनी स्वतःच्या ईगोसाठी जनतेचे 4 कोटी रुपये खर्च केले. त्यातील दोन कोटींची तर माती आणून टाकली. त्यामुळे शिवाजी पार्कची वाट लागली. रेनवॉटर हार्वेस्टिंग प्रकल्पही कोलमडला. शिवाजी पार्कच्या नुकसानासाठी जबाबदार असणाऱ्या विरप्पन गँग आणि वार्ड ऑफिसर किरण दिगावकर यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. तर दुसरीकडे मुंबईमध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचले आहे. पाण्यामुळे नाले तुंबल्याने पाणी रस्त्यावर आले आहे. यावरून भाजप नेते नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. देशात आर्थिक विकासाची गंगा आणणाऱ्या आपल्या मुंबईला आदित्यसेनेनेने आणि ठेकेदारांनी भ्रष्टाचाराची गटारगंगा केल्याचे नितेश राणे यांनी म्हटले आहे.
संदीप देशपांडे यांची शिवसेनेवर टीका करण्याची ही पहिलीच वेळ नाहीये, तर यापूर्वी देखील त्यांनी अनेकदा शिवसेनेवर निशाणा साधला आहे. शिवसेनेच्या प्रमाणपत्र मोहिमेवरून देखील त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. उद्धव ठाकरे हे मी हिदुंत्व सोडणार नाही असे लिहून देणार का ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता.