मुंबई : नागरिकत्व सुधारणा कायद्याला पाठिंबा देण्याची भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतली आहे. मात्र त्यावरुन मनसेच्या नेत्यांमध्येच मतमतांतरं असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे राज ठाकरे आज सलग दुसऱ्या दिवशी नेते आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार (MNS Leaders Confusion on CAA Support) आहेत.
राज ठाकरे यांनी ‘कृष्णकुंज’ या निवासस्थानी सकाळी 10 वाजता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. एनआरसीला पाठिंबा देण्यावरुन मनसे पदाधिकाऱ्यांमध्ये गोंधळ आहे. त्यासंदर्भातच ही बैठक असून पदाधिकाऱ्यांच्या शंकांचं निरसन होण्याचीही शक्यता आहे.
मला ‘हिंदूहृदयसम्राट’ म्हणू नका, राज ठाकरेंची सूचना
पहिल्याच महाअधिवेशनात मनसेने कात टाकत हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतला आहे. नागरिकत्व सुधारणा कायदा, राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी याच्या बाजूने राज ठाकरेंनी भूमिका घेतली आहे. मात्र मनसेच्या भूमिकेवरुन पक्षातील काही नेत्यांनीच राज ठाकरेंना प्रश्न विचारल्याचं समजतं.
मनसेची नेमकी भूमिका काय? मनसे सीएए आणि एनआरसीला पाठिंबा देऊन भाजपसोबत जाणार का? विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत घेतलेल्या भाजपविरोधी भूमिकेवरुन यूटर्न घ्यायचा का? असे काही प्रश्न मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केल्याचं म्हटलं जातं.
मुंबईतील वांद्रे परिसरात असलेल्या रंगशारदा सभागृहात काल (सोमवार 27 जानेवारी) मनसेची बैठक आयोजित करण्यात आली होती. केवळ दहा मिनिटात चर्चा आटोपून राज ठाकरे बैठकस्थळाहून निघाले. मनसे नेत्यांना पुढील सूचना देण्यास राज ठाकरेंनी सांगितलं. ‘सीएए’ कायद्याच्या समर्थनार्थ मनसेने 9 फेब्रुवारीला आयोजित केलेला मोर्चा यशस्वी झाला पाहिजे, अशा सूचनाही राज यांनी दिल्या आहेत.
बैठकीला बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई, आमदार राजू पाटील, अमेय खोपकर, अभिजीत पानसे यासारखे नेते उपस्थित होते. मनसेचे राज्यातील सरचिटणीस, उपाध्यक्ष, विभाग प्रमुख, जिल्हा प्रमुख, शहर प्रमुख उपस्थित होते.
दरम्यान, मला ‘हिंदूहृदयसम्राट’ म्हणू नका, अशा सूचना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. मनसेच्या महाअधिवेशनात मनसेच्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांना ‘हिंदूहृदयसम्राट’ असं संबोधलं होतं. त्यानंतर राज ठाकरेंनी हा पवित्रा घेतला.
MNS Leaders Confusion on CAA Support